बाहेर गावाहुन आलेले लोकही आपलेच, त्यांनी सर्वांच्या आरोग्यासाठी सहकार्य करावे


स्थैर्य, फलटण, दि. २५ :  फलटण शहर व तालुक्यात करोना बाधीतांची संख्या प्रारंभी कमी होती, आता त्याचा वेग वाढत असून प्रामुख्याने बाधीत भागातून आलेल्या लोकांमुळे हा वेग वाढल्याचे स्पष्ट झाले आहे, आगामी काळात ही संख्या अधिक वेगाने वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बाहेर गावाहुन आले तरी हे लोक आपलेच आहेत, त्यांची राहण्याजेवणाची व्यवस्था उत्तम करण्याबरोबर करोना प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी योग्य खबरदारी घेण्यासाठी त्यांनीही पुरेसे सहकार्य केले पाहिजे अशी अपेक्षा आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

करोना प्रादुर्भाव नियंत्रण व उपाय योजना यावर चर्चा करुन, अंमलबजावणीतील अडचणी समजावून घेऊन त्या दूर करणे, नियम/निकष समजावून देणे यासाठी येथील श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथे आयोजित बैठकीत आ. दीपक चव्हाण बोलत होते, यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे, उप नगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य, नगरसेवक/नगरसेविका, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आणि प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी अमिता गावडे, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे उपस्थित होते.व्यक्तीगत संबंधापेक्षा गावचे आरोग्यला प्राधान्य द्या

बाहेर गावाहुन परवाना घेऊन अथवा विना परवाना आलेल्या प्रत्येकाची माहिती तातडीने प्रशासनाला देणे, होम क्वारंटाइनमध्ये असलेले लोक बाहेर फिरत असतील, नातेवाईक त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्याला योग्य प्रतिबंध घालणे, नियम/निकषांची काटेकोर अंमलबजावणी याबाबी स्थानिकांनी आगामी १५ दिवस अक्षरशः डोळ्यात तेल घालून जपल्या पाहिजेत त्यासाठी गावातील संबंध बिघडतील याचा विचार न करता गावाच्या आरोग्याला प्राधान्य देऊन प्रत्येकाने ही आपली जबाबदारी समजून काम करावे असे आवाहन आ. दीपक चव्हाण यांनी केले.

गावातील सर्वांची एकजुट महत्वाची : ती जपायला हवी

आगामी १५ दिवस अत्यंत महत्वाचे असून सर्वांनी एकजुटीने गावाच्या आरोग्याला प्राधान्य देऊन काम करावे, गावातील किंवा बाहेरुन आलेल्या लोकांनी प्रशासनाने घालुन दिलेले नियम/निकषांची काटेकोर अंमलबजावणी होईल यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आ. दीपक चव्हाण यांनी केले.

करोना नियंत्रण फलटण पॅटर्न मार्गदर्शक

करोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे, त्याचप्रमाणे लॉक डाऊन मुळे बेरोजगार झालेल्या किंवा छोटे उद्योग व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक नियोजन कोलमडलेल्या लोकांसाठी स्वयंसेवी, सहकारी, सामाजिक संस्था, तरुण मंडळे, पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी जीवनावश्यक वस्तू किट वितरण, अन्नछत्र वगैरेंच्या माध्यमातून केलेले नियोजन उत्तम असून त्यातून इतरांना मार्गदर्शक ठरेल असा फलटण पॅटर्न निर्माण झाल्याचे नमूद करीत आगामी काळात करोना प्रादुर्भाव अधिक वाढणार नाही यासाठी गावपातळीवर नियुक्त समित्या व ग्रामस्थांनी योग्य नियोजन करावे असे आवाहन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

बाहेर गावाहुन येणारांचे स्वागत, मात्र त्यांनी येथे येताच आपली माहिती द्यावी

पुण्यामुंबईतील लोक मोठया संख्येने येथे दाखल होत आहेत, ते येथील रहिवासी असल्याने त्यांचे स्वागतच केले जाईल, मात्र त्यांनी योग्य दक्षता घेतली पाहिजे त्यांच्या व येथील रहिवाशांच्या आरोग्याला प्राधान्य देणारे प्रशासनाने केलेले नियम निकषांची अंमलबजावणी करण्याला त्यांनी सहकार्य केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच प्रामुख्याने बाहेरुन येताना परवानगी घेऊन अथवा न घेता आला असाल तरी येथे आल्यावर गावातील ग्रामपंचायत, आरोग्याधिकारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच यांना भेटून आपण कोठून आला, कोठे राहणार आहात, किती जण आहात व आपले आरोग्य कसे आहे याविषयी संपूर्ण खरी माहिती दिली पाहिजे त्यातून तुमचे व गावाचे आरोग्य अबाधीत राखणारी योजना प्रभावीरीतीने राबविणे शक्य होणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

गोखळी पुलावरुन वाहतूक पूर्ववत सुरु करा : खर्डेकर

करोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाय योजना करताना दैनंदिन मानवी जीवन अबाधीत सुरु राहील याची काळजी घेण्याची आवश्यकता नमूद करीत नीरा नदीवरील गोखळी पूल आणि बंधाऱ्यावरील वाहतुक बंद केल्याने आसू व परिसरातील ग्रामस्थांची मोठी कुचंबना होत असल्याचे नमूद करीत किमान गोखळी पुलावरील वाहतूक त्वरित सुरु करण्याची मागणी फलटण पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी केली आहे.

पूल बंद केल्याने वाहतूक धोकादायक मार्गाने सुरु

आसू हे फलटण तालुक्यातील पूर्व टोकाचे मोठे आणि बागायती पट्ट्यातील गाव असून पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील या गावातील शेतकरी व सर्वसामान्यांचा छोटी मोठी खरेदी, दवाखाना, शेतमाल विक्री किंवा शेतीची खते, बी-बियाणे खरेदी, येथील तरुणवर्ग मोठ्या संख्येने नोकरी धंद्यासाठी बारामतीशी संबंधीत असल्याने केवळ नदीवरील पूल व बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केल्याने हे थांबत नाही तर नदीच्या पाण्यातून किंवा अन्य धोकादायक मार्गाने ही वाहतूक सुरु आहे, त्यासाठी गोखळी पुलावरुन अधिकृत वाहतूक सुरु केल्यास त्याची नोंद झाल्याने नियंत्रण ठेवणे अधिक सोयीस्कर आणि सर्वांच्या हिताचे ठरणार असल्याचे निदर्शनास आणून देत गोखळी पुलावरुन वाहतूक सुरु करण्याची आग्रही मागणी सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी या बैठकीत केली.

प्रांताधिकाऱ्यांचे सहकार्याचे आवाहन

प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रितीने करोना नियंत्रणासाठी असलेले शासन निर्णय, प्रशासनाने त्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी केलेले नियोजन, गावपातळीवर सरपंच, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, आरोग्य सेविका यांची विशेष समिती त्यांचे कामकाज याविषयी, तसेच बाधीत रुग्ण, संशयीत रुग्ण, बाधीत व संशयितांच्या संपर्कातील लोक यांची व्याख्या स्पष्ट करीत त्याबाबत असलेले निर्बंध अत्यंत स्पष्टपणे नमूद करीत सर्वांना समजावून देत अंमलबजावणीसाठी या सर्व घटकांची एकजुट व त्याला लोकप्रतिनिधींचा पाठींबा करोना प्रादुर्भाव निश्चित नियंत्रणात ठेवू शकेल याची ग्वाही देत सहकार्याचे आवाहन केले.

गटविकास अधिकाऱ्यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करीत स्वागत केले

प्रारंभी गटविकास अधिकारी अमिता गावडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. तालुक्यात १२७ ग्रामपंचायती असून फलटण नगर परिषद असे सर्व सरपंच, नगराध्यक्ष, सर्व तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना आजच्या या बैठकीस निमंत्रित करताना सोशल डिस्टनसींगचा विचार करुन या सर्वांना वेगवेगळ्या ५ बैठकाद्वारे सामावून घेतले जाणार आहे, प्रत्येक बैठक दीड दोन तासांची असेल असे गटविकास अधिकारी अमिता गावडे यांनी प्रारंभी स्पष्ट केले.
Previous Post Next Post