आषाढी वारी
यावर्षीचा वारीसोहळा कोरोनामुळे रद्द झाला असून तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपुरला जाणार हायेत अशी बातमी घेऊन वसंता किसनाकडे आला....किसनाने बातमी ऐकली आणि तो मटकन खालीच बसला. त्याच्या अंगातील अवसानच गळाले. कोरोनामुळे गेले दोन महिने तो घरातच अडकून पडला होता. त्याचे डोळे आता आषाढी वारीकडे लागले होते. पंढरीचा पांडूरंग आपल्याला असा उघड्यावर येऊ द्यायचा नाही असा त्याचा पांडूरंगावर ठाम विश्वास होता...नव्हे श्रध्दा होती. आषाढी वारीच्या निमित्ताने त्याच्या तुळशीच्या माळा विकल्या जात आणि त्याची वारीही घडे...स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधे. पण या बातमीने त्याचा साऱ्या  आशा मावळल्या. बराच वेळ विचार करून त्याने काहीतरी ठाम निर्णय मनाशी घेतला. किसना लगबगीने उठला फडताळातील रेशन कार्ड, आधार कार्ड सोबत घेतले आणि तो पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला. तो तावातावानेच घरातून बाहेर पडला. आता पोलीस स्टेशनला जाऊन गावाकडे जायचा पास आणायचा आणि पास मिळाला की गावाकडे निघून जायच असा ठाम निश्चय त्याच्या मनाने घेतला होता. चालतच तो गोपाळपुऱ्यापाशी येऊन पोहचला. रोजच्या सवयीने त्याने नांदुकरकीच्या झाडाला आणि पारावर असलेल्या छोट्या मंदिरातील तुकाराम महाराजांच्या मूर्तीला वंदन केले. फार फार वर्षापुर्वी या गोपाळपुऱ्यातूनच तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते.

किसनाच्या घरात त्याच्या बापापासून वारी होती. किसनाचा बाप गाव सोडायला तयार नव्हता पण वाढलेल्या गोतावळ्यात आणि येणाऱ्या उत्पन्नावर भागेना म्हणून इकडे देहूला येऊन राहीला. येथेच तुळशीच्या माळा तयार करायला शिकला. त्यासोबतच आणखी काही काम करत प्रपंच संभाळला. गावाकडेही येणे जाणे ठेवले.

किसनाचा सारा प्रपंचा या तुळशीच्या माळा करण्याच्या व्यवसायावरच चालायचा. किसना तुळशीचे काष्ठ आणायचा आणि त्यापासून वेगवेगळ्या सुंदर माळा बनवायचा. गेले दोन महिने असलेल्या लाॅकडाउनमुळे त्याचे चालू चलन थांबले होते. अजून काही दिवस असेच राहीले तर किसनावर उपासमारीची वेळ येणार होती. आता त्याला आशा होत्या त्या वारीकडून. जर वारी सुरू झाली तर वारीतील वारकऱ्याकडून त्याच्या माळांची खरेदी झाली असती. सोबत त्याच्या चहाची गाडीही चालली असती.

किसना दरवर्षी वारीत चार पैशे मिळवायचा आणि त्यावर त्याचे साल पार पडायचे. आता वारीच रद्द झाली म्हणजे किसनाचे उत्पन्नाचे साधनच बंद झाले....

किसना गोपालपुऱ्यात आला होता. नांदुरकीचे झाड नेहमीप्रमाणे वाऱ्यावर डोलत होते. किसना तुकाराम महाराजांच्या गोजिऱ्या रूपाकडे पाहतच राहीला. पण तो लगेच भानावर आला. आज महाराजांचा त्याला रागच आला होता.  तो त्या हसऱ्या मुर्तीकडे पहात रागानेच बोलला ‘बुवा तुम्ही आम्हाला सोडून एकटेच वारीला निघालात. आजपर्यंत माझी वारी कधी चुकली नाही. तुमच्या सोबतच आजपर्यंत पंढरीला गेलो आणि आलो. पंढरीचा पांडूरंग डोळे भरून पाहिला. आजवर संसारातील काही दुखल खुपल तर ते तुम्हालाच सांगीतल तुम्हीच रस्ता दाखवला. माझा संसार तुमच्या जीवावरच चाललाय तुमचा आशिर्वाद पाठीशी आहे म्हणून आम्ही दोन घास सुखाने खातोय. पण तुम्ही तर आमच्या वरच रूसलात ...आम्हाला सोडून तुम्ही एकटेच निघाला  .....मागबी तुम्ही असच सगळ्यांना सोडून एकटेच वैकुंठाला निघून गेलात...आताही तुम्ही तसच करताय....तुमची आमच्यावरची मायाच लटकी.....हा रोग काय आला आणि आमचा देवच आमच्यापासून तोंड फिरवून राहू लागला. आजपासून तुमचा नी माझा दावा आहे’ अस म्हणत तो रागाने पाय आपटत बाहेर पडला.

किसना पोलीस स्टेशनमध्ये आला आणि ठाणे अंमलदाराजवळ सर्व कागदपत्रे दिली. "काम काय करतोस" या प्रश्नासरशी किसना म्हणाला "मी तुळशीच्या माळा करून विकतो आणि चहाची गाडी चालवतो."

किसनाच्या या उत्तराने साहेबांचे लक्ष किसनाकडे गेले. साहेबांनी किसनाला आत बोलावून घेतले. किसना दबकतच साहेबांच्या केबीनमध्ये गेला. तिथे साहेबासमोर दोन चांगल्या कपड्यातील माणसे बसली होती.
"तु काय काम करतोस म्हणाला?" साहेबांनी किसनाला पुन्यांदा विचारले.
"मी तुळशीच्या माळा तयार करतो आणि चहाची गाडी चालवतो."
साहेब समोरच्या माणसाकडे पहात म्हणाले "तुमचे काम झाले."
"किसना हे एका मोठ्या कंपनीतून आलेत. यांचे मालक वारकरी आहेत आणि दरवर्षी ते त्यांच्या कंपनीच्या कामगारांची एक दिंडी घेऊन येतात. यावर्षी वारी रद्द झाली म्हटल्यावर ते त्यांच्या कामगारांना वारीची यावर्षीची आठवण म्हणून तुळशीची माळ भेट देणार आहेत. त्यांना तुळशीच्या माळा हव्यात पण लाॅकडाउनमुळे यांची अडचण झालीय. तु यांना काही मदत करू शकतो का?"
साहेबांच्या या प्रश्नाने किसना भानावर आला.
"होय जी नक्की मदत करतो पण मी काय करायचे"
"आम्हाला पाचशे तुळशीच्या माळा हव्यात....तुम्ही त्या बनवून द्याल का?" कंपनीचे साहेब बोलले.
"होय देतू की   ...माझ्या कडे लय प्रकारच्या माळा आहेत. जपमाळ, दुपट्टीमाळ, पाचपट्टीमाळ, चंदणमाळ असे प्रकार हायेत. गहूमणी, गोलमणी, कळसमणी अश्या वेगवेगळ्या मण्याच्या माळाही आहेत. तुम्हाला कसल्या हव्यात."
कंपनीच्या साहेबांनी गळ्यातील कळसमण्याची माळ दाखवत सांगितले, "अश्या पाचशे माळा एकादशीच्या अगोदर एक दिवस आम्हाला करून द्या."
" देतो साहेब पण तुळशीमाळ म्हणजे देवाचा दागीना आहे.....त्याची अनमान व्हायला नको"
"बरोबर आहे तुझं....आम्ही त्याची पुर्ण काळजी घेऊ" अस म्हणत त्यांनी खिशातून एक पाकीट काढून किसनाच्या हातात ठेवले.
किसनाला विश्वासच बसेना. पैश्याचे जाड पाकीट बघून किसना हरकून गेला. तो इन्स्पेक्टर साहेबांच्या आणि कंपनीच्या साहेबांच्या समोर वाकून म्हणाला "लय उपकार झाले साहेब.  माझ्या हाताला काम मिळाले. वारी रद्द झाल्यामुळे माझ्या हातचे काम गेले आता मी गावाकडे जाणार होतो पण तुम्ही देवासारखे धाऊन आलात... .देवच पावला."

किसनाच्या चेहऱ्यावरील समाधान पहात साहेब म्हणाले, "किसना उद्यापासून तु रोज आमच्या पोलीस स्टेशनला चहा पुरवायचा... हेही काम तुला देतो."

किसनाला एक म्हणता दोन काम मिळाली...तो लांबुनच साहेबांच्या पाया पडला. किसना पळतच गोपाळपुऱ्यात आला. नांदुकरकीचे झाड शांत उभे होते. किसना तुकाराम महाराजांच्या समोर उभा राहिला...महाराजांची हसरी मुद्रा प्रसन्न दिसत होती. महाराज मी चुकलो मी तुम्हाला काहीबाही बोललो....तुमच्याशीच दावा मांडला...माझ गाऱ्याण तुम्ही ऐकलं....माझ्या हाताला काम दिल. माझ्या लेकराबाळांला दोन घास दिल....

"चुक झाली एक वेळा! मजपासून चांडाळा!! 
उभे करोनी जळा! माजी वह्या राखील्या !!"

महाराजांचाच अभंग अनाहुतपणे किसनाच्या तोंडून बाहेर पडला. किसना गालावर मारत बोलू लागला देवा मला माफी करा.. म्या चांडाळाने तुम्हावर आळ घेतला .....तुम्ही माझ घरदार, संसार राखलात. उघड्यावर पडणाऱ्या माझ्या बायकालेकरांना तुम्ही पदरात घेतलं....माजी लाज राखली तुम्ही   ...मीच पाप्याने तुम्हाला बोल लावले...माझी भक्ती वाया गेली नाही.....माझा देव माझ्यासाठी धाऊन आला.....त्याच्या डोळ्यातून अश्रू घळाळू लागले.....नांदुकरकीच्या पानांची सळसळ वाढली.

"......तुका म्हणे मज प्रचिती आली देखा आणि या लोका काय सांगू ...." जवळच्या देहूच्या देवळातून ह्या अभंगांचे शांत स्वर वा-यात मिसळत होते...

वारकरी
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya