राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनी सातारा जिल्ह्यात १ हजार कार्यकर्त्यांचे रक्तदान
स्थैर्य, सातारा, दि. १० : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १ हजार कार्यकर्ते व हितचिंतकांनी जिल्हाभर रक्तदान केले. प्रारंभी सकाळी पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील व आ.शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनिल माने, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे व मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन ,येे पक्षध्वजारोहण करण्यात आले.

राष्ट्रवादी वर्धापनदिनामित्त कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवू नये या हेतूने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील सर्व तालुकयात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणाने रक्तदान केले. विशेष म्हणजे सातार्‍यामध्ये श्रीमती दिपाली क्षीरसागर या महिलेने सामाजिक जाणीव ठेवून रक्तदान केले. या रक्तदातीचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्हा असलल्याने मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. शारीरिक अंतर राखून राष्ट्रवादी भवनच्या प्रवेशद्वाराजवळ येणार्‍या कार्यकर्त्यांची तपासणी करून त्यांना प्रवेश देण्यात येत होता. राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, स्वप्नील डोंबे, शफिक शेख, निवास शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदानात सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांसाठी खास व्यवस्था केली होती.

सातारा शहरात शंभर ते सव्वाशे युवकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. आ.शशिकांत शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर प्रथमच ते जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने अनेक युवकांनी त्यांच्यासमवेत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. राष्ट्रवादी भवनमध्ये जल्लोषाचे वातावरण अनेक कार्यकर्त्यांनी अनुभवले. कराड येथे खासदार श्रीनिवास पाटील, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे  तसेच सातार्‍यात सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मारूती  इदाटे, सौ.समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, सेवादल अध्यक्ष राजेंद्र लावंघरे - देशमुख यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी आभार मानले.
Previous Post Next Post