चीनने शांततेद्वारे वाद सोडवण्यास दिली सहमती : चीन नरमला
स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 7 : सीमेवर आक्रमक भूमिका घेऊन वाद वाढवणार्‍या चीनने आता नरमाईची भूमिका घेतली आहे. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांमध्ये शनिवारी चर्चा झाली. या चर्चेत चीनने सीमेवरील वाद शांततेच्या मार्गातून सोडवण्याची तयारी दर्शवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी या संदर्भात माहिती दिली. द्विपक्षीय करारानुसार दोन्ही देश सीमा भागातील स्थितीवर शांततेद्वारे तोडगा काढण्यावर सहमत झाले आहेत. उभय देशातील लष्कराच्या कमांडर पातळीवरील चर्चा शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी केलेली माहिती

परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. पूर्व लडाखमध्ये सुरू असलेला वाद हा शांततेद्वारे आणि द्विपक्षीय करारानुसार सोडवण्यात येईल. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यासाठी सीमा भागात शांतता आवश्यक आहे. हा वाद लवकर सोडवल्यास दोन्ही देशातील संबंध आणखी पुढे जाऊ शकतात. उभय देशातील राजनैतिक संबंधाच्या 70 व्या वर्षपूर्तीचाही यावेळी उल्लेख झाला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

चीनसोबत लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरूच राहील, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. मात्र लडाखमध्ये सीमेवर तैनात केलेले सैनिक माघारी बोलावण्याबाबत काही निर्णय झाला आहे का यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाने काही माहिती दिली नाही. पुढच्या टप्प्यातील चर्चेत तणाव कमी करण्यावरील रूपरेषा निश्‍चित केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.

पूर्व लडाखमधील परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. त्यावर दोन्ही देशांकडून लष्करी अधिकार्‍यांमध्ये चर्चा निश्‍चित करण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी पूर्व लडाखमधील चीनच्या ताब्यात असणार्‍या माल्दो येथे ही चर्चा झाली. भारताच्यावतीने लेहस्थित 14 व्या कोअरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सहभागी झाले होते तर चीनच्यावतीने तिबेट लष्करी विभागाचे प्रमुख सहभागी झाले होते.
Previous Post Next Post