तन , मन , धनाने भक्ती करणारा भक्त भगवंताला प्रिय : ह भ प सचिन पवार
स्थैर्य, श्री क्षेत्र आळंदी दि. 25 : भगवंताच्या ठिकाणी अनन्यश्रध्दा ठेवून त्यालाच परमगती समजणारे व त्याच्याच सेवेत आपले आयुष्य कंठणारा तसेच  तन , मन , धनाने  भक्ती करणारा भक्त भगवंताला प्रिय असतो असे प्रतिपादन ह भ प सचिन महाराज पवार यांनी केले.

आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफ एम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने " पालखी सोहळा पत्रकार संघ " या फेसबुक पेजवर दररोज सायंकाळी ४ वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( बुधवार ) बाराव्या  दिवशी पुणे येथील ह भ प सचिन  महाराज पवार   यांनी "भक्तीयोग "  या  बाराव्या अध्यायावर सुरेख निरुपण केले .

जय जय शुध्दे l उदारे प्रसिध्दे l
अनव्रत आनंदे l वर्षतिये ll

या बाराव्या अध्यायाचे निरुपण करताना ह भ प पवार  महाराज म्हणाले , माउलींनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे अत्यंत सुरेख वर्णन केले आहे . भक्तियोगाची व्याख्या स्पष्ट करताना माउली म्हणतात तु शुध्द आहेस , तु स्वतः सिध्द:, विख्यात , उदार म्हणून सर्वत्र प्रसिध्द आहेस . तुझ्या भक्तावर कितीही संकटे आली तर तुच त्याचे निवारण करतो . तुझ्या ठिकाणी चित्त ठेवून नित्यसमाहित होवून परमश्रध्देने युक्त असलेले तुझे भक्त श्रेष्ठ योगसंप्पन्न आहेत . मन आणि बुध्दी या दोघांनी भगवंताच्या ठिकाणी अनन्यभावे शरण गेला तर देव आणि भक्त यात फरकच राहात नाही . व्यक्त , अव्यक्त स्वरुप देवाला आवडते . भगवंत हा दयेचा सागर आहे . भगवान श्रीकृष्ण व अर्जुन या दोघांचे नाते देव आणि भक्त असे आहे . देव हा भक्ताचा भुकेला आहे . तुकोबारायांचे पुर्वज विश्वंबरबाबा हे आषाढी वारीला जावु शकले नाही म्हणून त्यांनी देवाला आर्जव केला . विश्वंबरबाबांच्या निरपेक्ष भक्तीला पांडुरंग परमात्मा पावला व रुखमाईसह ते देहूला आले . विठ्ठल रुक्मिणीची एकत्र मूर्ती आपणाला देहुत पाहायला मिळते ते त्या भक्तीचे फळ आहे .  ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ गीतेवर केलेली टीका नसून तो शुध्द अंतकरणाने समजून घेण्याचा ग्रंथ आहे . ज्ञानेश्वरी हा माउलींचा वैचारिक चरित्र ग्रंथ असून बहुजन समाजाला अत्यंत सोप्या भाषेत समजेल असे या ग्रंथाचे माउलींनी निरुपण केले आहे असे ते म्हणाले . या कार्यक्रमाचे निवेदन ह भ प स्वामीराज भिसे यांनी केले .

आज गुरुवार  दि . २५ रोजी खोची जि कोल्हापूर   येथील ह भ प  बंडु उर्फ विनायक महाराज चौगुले  हे सायंकाळी ४ वाजता " " पालखी सोहळा पत्रकार संघ " या फेसबुक पेजवर श्री ज्ञानेश्वरीच्या " प्रकृतिपुरुषविवेकयोग " या तेराव्या अध्यायावर निरुपण करतील .

दरम्यान आज ( बुधवार ) पहाटे श्री क्षेत्र आळंदी येथे आजोळघरी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची विधीवत पूजा , अभिषेक व आरती पालखी सोहळा प्रमुख योगेश महाराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आली . यज्ञेश्वर जोशी व राहूल जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले . रात्री भूई दिंडीच्या  वतीने कीर्तनाची सेवा तर रात्री भोपळे दिंडीच्या  वतीने जागराची सेवा करण्यात आली .
Previous Post Next Post