पूर नियंत्रणासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज:पिनकोड निहाय बल्क मेसेज यंत्रणा राबवणार
कराड येथे आपत्ती व्यवस्थापन बैठकीत जिल्हाधिकार्‍यांची माहिती


स्थैर्य, कराड, दि. 24 : पावसाळयामध्ये उध्दभवणार्‍या पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी सातारा जिल्ह्याची यंत्रणा सज्ज असून यावर्षी आलेल्या कोरोना संकटाचा विचार करून पूरपरिस्थिती हाताळण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नदीकाठावरील गावांमधील जनतेला पुराच्या धोक्याची पुर्वसूचना देण्यासाठी पिनकोड निहाय बल्क मेसेज यंत्रणेचा वापरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

येथील स्व.यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनामध्ये कराड तालुक्यात पावसाळयातील संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्व तयारीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, नगरसेवक, नदीकाठच्या गावचे सर्व सरपंच, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, ग्रामसेवक व कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकार्‍यांनी पूरपरिस्थिती संदर्भात केलेल्या पूर्वतयारीची माहिती पत्रकारांना दिली.

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, गेल्या वर्षी 100 वर्षातील सर्वाधिक पाऊस झाल्याने कराडला भयानक पूरपरिस्थिती निर्माण झाली. मात्र प्रशासकीय यंत्रणांनी राबवलेल्या उपाययोजनांमुळे अतिशय चांगल्या प्रकारे पूरपरिस्थिती हाताळण्यात आली. या सर्व बाबींचा अभ्यास करून यावर्षी अधिक चांगल्या प्रकारे पूरपरिस्थितीशी लढण्याची तयारी करण्यात आली आहे. ज्या त्या भागातील व गावांतील पुराच्या धोक्यासंदर्भात सूचना द्यावयाच्या आहेत, त्यासाठी पिनकोड निहाय बल्क मेसेज यंत्रण यावर्षी राबवण्यात येणार आहे.

कराड तहसिल कार्यालयाकडे पूर्वीच्या दोन बेटी आहेत. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने नुकत्याच आणखी दोन बेटी कराडला दिल्या आहेत. याबाबत नदीकाठच्या गावांतील स्वयंसेवक, अधिकारी व कर्मचार्‍यांना बोट चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. याशिवाय कराड पंचायत समितीकडे दोन नादुरूस्त फायबर बोटी आहेत. येत्या आठ दिवसांत या दोन्ही बोटी दुरूस्त करून कराडला देणार आहेत. तसेच ऐनवेळी गरज पडलीच तर आणखी बोटी उपलब्ध करण्याची सोय केली आहे.

पूरपरिस्थितीत स्थलांतरीत करण्यात येणार्‍या कुटुंबांचा अभ्यास करण्यात आला आहे. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, अशा पद्धतीने पूरग्रस्तांचे तात्पुरते पुर्नवसन करण्यात येणार आहे. त्याचे जेवण, शौचालय आदी प्रकारची सर्व सोय करण्यात आली आहे. याबाबत पुररेशेतील लोकांना पूर्वकल्पना देण्यात येत आहे. म्हणजे पूर आल्यानंतर त्या लोकांना आपली जनावरे व साहित्य घेऊन कुठे जायचे आहे, याची पूर्वकल्पना असणार आहे.

महामार्गावर पाणी आल्याने महामार्गावर शेकडो ट्रकचालक व वाहनचालक अडकून पडतात. गेल्या वर्षी या लोकांची प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी जेवणाची व्यवस्था केली होती. यावर्षी महामार्गावर अडकणार्‍या ट्रकचालक व अन्य वाहनचालकांची जेवणाची सोय व येणार्‍या अन्य अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना आखली आहे.


पावसाळयानंतर पूररेषेतील लोकांच्या पुर्नवसनाच्या प्रश्नला प्राधान्य 

कराडसह संपूर्ण राज्यात पूररेषेतील लोकांच्या पुर्नवसनाचा प्रश्न आहे. कराडबाबत आपत्कालिन बैठकीत चर्चा झाली. पूर रेषेतील लोकांच्या पुर्नवसनाचा प्रश्न पावसाळापूर्व सोडवणे शक्य नाही. मात्र पावसाळयानंतर कराडच्या पूर रेषेतील लोकांचे पुर्नवसन करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.

Previous Post Next Post