नागपूरमध्ये भर बाजारात कुख्यात गुंड बाल्या वंजारीला संपवलं
स्थैर्य, नागपूर, 08 : लॉकडाउनमध्ये शांत असलेली नागपूरनगरी आता पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनांनी काळवंडलेली आहे. एकापाठोपाठ हत्यांनी नागपूर शहर हादरून गेले आहे. रविवारी संध्याकाळी पारडी परिसरात कुख्यात गुंड प्रदीप उर्फ बाल्या वंजारीची खून करण्यात आला. भर बाजारापेठेत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य मार्गावरील आठवडी बाजारात ही घटना घडली. बाल्याचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली आहे. बाल्या वंजारी हा कुख्यात गुन्हेगार असून पोलिसांनी त्याला तडीपार देखील केले होते, अशी माहिती पुढे आली आहे.

बाल्या वंजारी हा परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याचे अनेकांशी वाद वाढले होते. पारडी मार्गावरील आठवडी बाजार भरला असताना बाल्या त्याठिकाणी असल्याची माहिती समजताच आरोपी नरेंद्र मेहर याने बाल्याला गाठून त्याचा निर्घृण खून केला.

सुमारे महिनाभरापूर्वी बाल्या आणि आरोपी नरेंद्र मेहर या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्याच वादाचे रूपांतर बाल्या वंजारीचा खुनात झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नागपुरात खुनाच्या घटनांचे सत्र अजूनही सुरूच आहे. गेल्या 12 दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात खुनाच्या 12 घटना घडल्या आहेत. तर नागपूर शहरात आठ व्यक्तींची हत्या झाली आहे.

नागपुरात प्रामुख्याने 27 मे रोजी एमआयडीसी आणि सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत खून, 29 मे रोजी पारडी पोलीस ठाण्यांतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला. तर 1 जूनला लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत, तसंच 2 जूनला कोतवाली आणि 3 जूनला यशोधरानगमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मार्च महिन्यात संपूर्ण शहरात केवळ 5 खुनाच्या घटना घडल्या. मात्र दोन दिवसांत शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या चार हत्याकांडांनी उपराजधानी असलेले नागपूर जिल्हा हादरला आहे.

खुनांच्या वाढत्या घटनांनी नागपूरकरांमध्ये दहशतीचे वातावरण असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Previous Post Next Post