मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पाकिस्तानातून फोन
स्थैर्य, मुंबई, दि. 30 : मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलला दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्याचा फोन आला होता. यानंतर ताज हॉटेलच्या बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील कराची येथून ताज हॉटेल बॉम्बस्फोट करत उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर ताज हॉटेल आणि आसपासच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोबतच ताज हॉटेल समुद्राला लागून असल्याने समुद्रात गस्त वाढवण्यात आली असून लक्ष ठेवलं जात आहे.

धमकी देणारा फोन पाकिस्तानमधील नंबरवरुन आला होता. फोन आल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवण्यासोबतच तपासही सुरु केला आहे. फोन आला त्या नंबरची पूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस सध्या करत आहेत.

ताज हॉटेल मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असून इथे नेहमीच लोकांची वर्दळ असते. पण लॉकडाउनमुळे सध्या येथील परिसरात शांतता आहे. २६/११ हल्ल्यात दहशतवादी ताज हॉटेलमध्ये घुसले होते. यामुळे ताज हॉटेलबाहेर नेहमीच पोलिसांचा कडक बंदोबस्त असतो.

धमकी देणारा कॉल मध्यरात्री साधारण साडेबाराच्या सुमारास आला होता. हा फोन पाकिस्तानमधून करण्यात आला आहे. हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Previous Post Next Post