सातारचं नाट्य वैभव - बाळ कोल्हटकर
आज 30 जून, आज बाळकाका गेल्याला 26 वर्षे उलटली. अर्थात जातस्यहि ध्रुवो मृत्यू म्हणजे जन्माला येणार्‍या प्रत्येकाला कधी तरी मृत्यूला सामोरे जावे लागतेच हे विधीलिखित असले तरी काही मृत्यू उगीचच चटका लावून जातात. आणि हे व्हायला नको होते म्हणून काळजात कायमचे घर करून राहतात.

बाळकाका म्हणजे बाळ कोल्हटकर, एक काळ रंगभूमीवरचा रसिक प्रिय नाटककार आणि नट म्हणून लोकप्रिय व्यक्तीमत्व. सातारच कोल्हटकरांच घर त्या काळात नाटकवाल्यांच घर म्हणूनच ओळखलं जायचं. त्यामुळे नाटकाचे आणि आणि नाट्यप्रेमाचे संस्कार बाळकाकावर जन्मजातच. जेमतेम 11 वी पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल मधे 11वी पर्यंतची वाटचाल करतानाही त्याची नाट्यलेखनाची प्राथमिक तयारी सुरू झाली होती. त्यात शां गो गुप्तेंसारखे नाट्यप्रेमी रसिक आणि नाटककारही त्याला शिक्षक म्हणून लाभले. बाळकाकाने शिक्षक म्हणून त्यांच्यकडून नियमित धडे घेण्यापेक्षा त्यांच्या नाट्यप्रेमाचे धडेच त्यांच्याकडून जास्त घेतले. असे म्हणले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही.जेमतेम अकरावीपर्यंतचा शैक्षणिक प्रवास जेमतेम पार पडल्यावर बाळकाकाने सातारा सोडला. पोटापाण्यासाठी रेल्वेतल्या तिकीट चेकरपासून मिळेल त्या नोकर्‍या करत त्याने आपले नाट्यप्रेम शाबूत राखले. मुंबईची माणस, एखाद्याच नशीब, सारख्या नाटकापासून सुरू झालेला नाट्यलेखनाचा प्रवास बहरत गेला. तो आकाशगंगा, आणि दुरितांचे तिमीर जावो या नाटकातून बाळकाकाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोचवण्यात यशस्वी ठरला. त्याची सारी नाटके अपवाद उघडले स्वर्गाचे दार, वार्‍यत मिसळले पाणी, शिवरायकवि भूषण, सीमेवरून परत जा सारखे अपवाद वगळले तर त्याची सारी नाटके पूर्णपणे त्या काळातील मध्यमवर्गीयांची सुखदु:खे रंगवणारी होती. दुरितांचे तिमीर जावो, आणि वाहतो ही दुर्वांची जुडी ही त्याची रसिकानी डोक्यावर घेतलेली नाटके तर खास सातारीच नाही तर शुक्रवार पेठेतील वातावरणातली होती. दुरितांचे तिमीर जावो मधला दिगू, सदा गुरव, मोहिते धांदरफळे ही सारी थोडी नावे बदलून पण आमच्य घराच्या अवतीभोवतीची आणि त्या काळच्या शुक्रवार पेठेतील आमच्या घराशी जवळीक असणारीच होती. त्या काळात एखाद्या नाटककाराच्या नाटकाने शंभर प्रयोगाची सीमा आलांडली की त्याने मोठा पराक्रम केला अशी सामान्य रसिकांची भावना असे. बाळकाकाच्या जवळपास सर्व नाटकांनी हीच नाही तर पाचशे प्रयोगांचीही सीमा सहजपणे पार पाडली. नाटक सुरू झाले की आपल्या खिळवून ठेवणार्‍या संवादानी आणि अभिनयाने सारे प्रेक्षागृह पंत्रमुग्ध करून भावनांच्या हिंदोळ्यावर हलवत ठेवणे आणि हासू आणि आसूंचा महापूर आणण्याचे कसब बाळकाकाला सहजसाद्य होते. मगे ते प्रक्षागृह कोकणातले असो, विदर्भातले असो अगर मुंबई पुण्यातले. समाजाच्या सर्व थरातला तो आवडता नट आणि नाटककार होता. यशवंतराव चव्हाणांपासूत ते वसंतराव नाईक, वसंतदादा या सारख्या दिग्गज राजकारण्यांपासून ते ग. दि माडगुळकर, गो. नि. दांडेकर, पु. भा. भावे या दिग्गजाशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते. परिस्थितीची अनेक स्थित्यंतरे पहात मुंबईतल्या खारच्या झोपडपट्यीपासून ते ते अंबरनाथच्या भूषण बंगल्यापर्यंतचा त्याचा प्रवास हा केवल त्याच्या गुणवत्तेवरच घडला होता. हे सारे घडल्यावर आणि वैभवाचे आणि लोकप्रियतेचे शिखर गाठल्यावरही आपले कौटुंबीक भावबंध त्याने मनापासून जपले. माझ्या आई वडिलांवर त्याचे विशेष प्रेम. कारण बाळकाका पौगंडावस्थेत असताना मातृसुखाला पारखा झाला पण त्यानंतरही आईचे प्रेम त्याला माझ्या आईकडूनच मिळत राहिले. आणि हे त्याने अखेरपर्यंत जपले. एकदा तो अचानक सातारला आला. घरी आल्यावर दुपारी मला म्हणाला, चल मामलेदार कचेरीत जाऊ.’ मला कळेना की याचं मामलेदारू कचेरीत काय काम आहे. पण मी त्याला स्कूटरवरून मामलेदार कचेरीत घेऊन गेला. तिथ त्याना एका स्टँपव्हेंडरकडून सातारच्या घरावरचा हक्क सोडल्याच प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं. ते घेऊन मामलेदार कचेरीत जाऊन नायब तहसिलदारापुढे जाऊन उभा राहिला. करगदरावरच नाव वाचून तो ना. तहसिलदार उभाच राहिला. त्याने विचारले तुम्ही ते नाटकवाले का? बाळकाका नुसताच हसला. तहसिलदार म्हणाला, साहेब लाजवताय का? तो स्टँपपेपर घेऊन मामलेदारामडे गेला. मामलेदार ते वाचून बाहेर आला. आणि बाळकाकाला आग्रहाने आत घेऊन गेला. म्हणलाला सह्या होतील हो. पण तुमच्या सारख्यांचे पाय आमच्या ऑफिसला लागले हे आमचे नशिब. सार उपचार आटोपले आणि आम्ही बाहेर पडलो.

एकदा सातारा मुक्कामी असताना आनंद हा चित्रपट जयविजयला लागला होता. बाळकाका म्हणाला चल सिनेमा पहायला जाऊ. त्या आधी सारे रजताद्रिीत गेलो. किमान दहा जण तरी आम्ही बरोबर होतो. खानपान झाले त्यावेळी गल्ल्यावर एक गृहस्थ आमच्यावर ळक्ष ठेवून उभे होते. वेटर बी घेऊन आला. आणि दोनच मिनिटात वेटर बील परत घेऊन गेला. बिलात काही चूक झाली असेल अशा समजुतीने आम्ही वाट पहात होतो. थोड्या वेळाने उठून गल्ल्यावर गेलो आणि बिलाची चौकशी केली तर ता म्हणाला मालकानी बील घ्यायचे नाही म्हणून सांगितलंय. गल्ल्यावर आमच्याकडे लक्ष देऊन उभे होते ते शामण्णा शानभाग होते. ते म्हणाले धंदा तर रोजच करतोय. तुच्यासारख्याला सेवा देऊन समाधानी करण्यातला आनंद हा पैशाहून कितीतरी मोठा आहे. साहेब आता काही बोलू नका. परत यावसं वाटेल तेव्हा आग्रहाचं बोलावण आहे असं समजून या. या बाळकाकाच्या रसिक प्रियतेच्या मोजक्या आठवणी. बाळकाकाच्या दुरितांचे तिमीर जावो मधला दिगू ‘हवास तेव्हा तुला जवळतील। गरज संपता दूर लोटतील। ओळखून ही रीत जगाची। रहा जवळ लांबून जरा॥ असे म्हणत असला तरी आज सव्वीस वर्षे लोटल्यावरही बाळकाकाच्या आठवणींपासून दूर राहणे शक्यच होत नाही. नाटक म्हणल की पहिल्यांद आठवतो तो बाळकाकाच.

संजय कोल्हटकर, सातारा 
Previous Post Next Post