एस.एम. देशमुख यांना विधान परिषदेवर घ्या
स्थैर्य, सातारा, दि. २८ : ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते एस. एम. देशमुख यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषद आणि सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने शनिवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद दिला.

शुक्रवारी खा.शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. दिलीप वळसे-पाटील सातारा दौऱ्यावर होते. येथील शासकीय विश्रामगृहावर आल्यानंतर त्यांची मराठी पत्रकार परिषद आणि सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी वेळ देवून शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून माहिती घेतली  व सकारात्मक चर्चा केली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, परिषदेचे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, परिषद प्रतिनिधी सुजित आंबेकर, विठ्ठल हेंद्रे उपस्थित होते. विधान परिषदेच्या बारा जागांवर राज्यपालांकडून लवकरच नियुक्त्या करण्यात येणार आहेत. साहित्य, पत्रकारिता, कला, सामाजिक कार्य या क्षेत्रातील व्यक्तींचीच या जागांवर नियुक्ती केली जावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. याअनुषंगाने पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून व आठ पुस्तकांचे लेखन करणारे लेखक म्हणून  एस. एम. देशमुख यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे अशी एकमुखी मागणी राज्यातील पत्रकारांकडून करण्यात आली असल्याचे पवार यांना सांगण्यात आले. एस. एम. देशमुख यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून घेतले गेले तर राज्यातील पत्रकारांचे प्रश्न तर सुटतीलच त्याचबरोबर समाजाच्या प्रश्नांवर देखील ते आवाज उठवतील असा विश्वास भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळाने शरद पवार यांना दिला. पत्रकारांचा प्रतिनिधी विधान परिषदेवर घेण्याबाबत आपण विचार करू, असे शरद पवार यांनी सांगितले.
Previous Post Next Post