वाळू व्यवसायिक, कामगारांची मुजोरी
स्थैर्य, कातरखटाव, दि. 07 : खटाव तालुक्यातील सिध्देश्वर कुरोली व येरळा नदीकाठच्या अनेक गावात लॉकडाऊन मध्येही अवैद्यरित्या वाळू उपसा व वाहतुक राजरोसपणे सुरु असल्याचे चित्र असून  वाळू व्यवसायिकांकडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर केला जात आहे. कुरोली येथे शेताकडील नदीपात्रात उपसा करण्यास प्रतिबंध केला म्हणून चिडून जावून वाळू व्यवसायिक व कामगारांनी शेतकरी युवकास लाकडी दांडक्याने मारहान करण्याबरोबर शेतातील अवजारांची चोरी करण्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, लॉकडाऊनमध्येही खातगुण, खटाव पासून भुरकवडी, वाकेश्वर, सिध्देश्वर कुरोली, वडूज, नढवळ, येरळवाडी, अंबवडे, गोरेगांव, मोराळे पर्यंत वाळू व्यवसायिकांनी रात्री, अपरात्री तसेच सुट्टीच्या दिवशी बेसुमार वाळू उपसा सुरु ठेवला आहे. मध्यंतरी स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेने मोठी कारवाई करुनही वाळू व्यवसायिकांवर किंचीतही परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे.  कुरोली, खटाव गांवच्या शिवेवर नदीपात्रात दुपारच्या वेळी खटाव येथील काही युवक अवैद्यरित्या वाळू उपसा करत होते. त्यास कुरोली येथील अमरसिंह हणमंतराव देशमुख (वय ३५) या युवकाने विरोध केला. त्यामुळे चिडून जावून संदिप शिवाजी पाटोळे, अमोल (पुर्ण नांव माहिती नाही) व इतर चार लोकांनी काठी व हाताने  जबर मारहाण केली. देशमुख याच्या डोक्यास काठीचा मार लागला आहे. या प्रकरणी सलग दोन दिवस हेलपाटे मारल्यानंतर वडूज पोलीसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकाराने नदीकाठचे शेतकरी भयभीत झाले आहेत. वाळू व्यवसाय करणार्‍या उर्मट लोकांवर कठोर कारवाई करण्याबरोबर वाळू व्यवसायिकांना पाठीशी घालणार्‍या प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांची चौकशी करावी अशी मागणी युवा कार्यकर्ते चंद्रसेन देशमुख यांनी केली आहे.
Previous Post Next Post