सातारा जिल्हा पोलीस दलाला कोरोना पाठोपाठ जिल्ह्यातील क्राइम रेट थांबविण्याचे आव्हान पेलावे लागणार
स्थैर्य, सातारा, दि. 07 : चौथा लॉकडाउन संपुष्टात येताच वाळू माफियांच्या उच्छादासह लागोपाठ तीन दिवसांच्या फरकाने झालेल्या दोन खुनांच्या मालिकेमुळे सातारा जिल्हा पुरता ढवळून निघाला आहे. तब्बल तीन महिने शांत असणारा जिल्हा पुन्हा एकदा अशांत दिशेने वाटचाल करू लागल्यामुळे आता सातारा जिल्हा पोलीस दलाला कोरोना पाठोपाठ जिल्ह्यातील क्राइम रेट थांबविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. गुरुवारी सातारा तालुका पोलीस ठाण्यातच कोयत्याने वार करून एकाचा खून केल्याची घटना ही फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पोलीस ठाण्यात खून होणे ही जिल्ह्यातील बहुधा पहिलीच घटना ठरली आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाउन जारी केला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवत नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना दिल्यामुळे जिल्हावासीयांनी या सूचनांचे तंतोतंत पालन केले. परिणामी आपोआपच समाजातील काही समाजकंटकांकडून होणारी वादावादी, हाणामारी, चोरी, चोरीचा प्रयत्न, महिलांशी संबंधित गुन्हे, खुनाचा प्रयत्न, खून, बेकायदेशीर जुगार- मटके अड्डे यांना चांगलाच चाप बसला. त्या काळात क्राइम रेट कमी झाला असला तरी पोलिसांवर समाजाचे कोरोनापासून संरक्षण करण्याची फार मोठी जबाबदारी येऊन पडली.

सातारा शहरासह जिल्ह्यातील ठिकठिकाणी पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी पंढरपूरच्या प्रति विठ्ठलाची भूमिका बजावली. आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उभे राहून विनाकारण फिरणार्‍या वाहनधारकांचे प्रबोधन करणे, सांगूनही न ऐकणार्‍या वाहनचालकांना काठीचा प्रसाद देणे, प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यापासून नागरिकांना रोखणे यासारख्या अनेक महत्त्वाच्या भूमिका पोलिसांनी पार पाडल्या. लॉकडाउनच्या काळात दारू विक्रीला बंदी असतानाही चोरटी दारू वाहतूक करून त्याची विक्री करणार्‍यांच्या मुसक्या आवळण्याचे कामही पोलिसांनी केले. मार्चनंतर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच मुक्काम ठोकला. कोरोना अनुमानित बरोबर बाधितांची संख्याही वाढू लागली. त्यावर उपाय म्हणून लॉकडाउनच्या काळात वाढ करण्यासह तो अधिक तीव्र करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला. या संपूर्ण काळात गुन्हेगारी कारवाया पूर्णपणे थंडावल्या होत्या. चोरी करण्यास घराबाहेर पडण्याचे धाडस चोरट्यांमध्ये  राहिले नव्हते. त्यामुळे एखादा अपवाद वगळता सातारा शहरासह जिल्ह्यात चोरीची एकही घटना गेल्या तीन महिन्यामध्ये घडली नाही. सर्व दुकाने, कंपन्या बंद. बांधकामे करण्यास मज्जाव केल्यामुळे फ्लॅट, घरे, बंगले, रो-हाऊस, अपार्टमेंट, कमर्शियल कॉम्प्लेक्स यांची कामे पूर्ण ठप्प झाली. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नदीपात्रे शांत होती. ना वाळू उत्खनन ना त्याची वाहतूक करता येत होती. त्यामुळे वाळू माफियांनी लॉकडाउनच्या काळात शांत बसणे पसंत केले. थोडक्यात कोरोनाने लोकांमध्ये एवढी भीती निर्माण केली होती, की तीन महिन्याच्या काळात पोलीस ठाण्यामध्ये वादावादी, मारामारी, चोरीचा प्रयत्न, चोरी, खुनाचा प्रयत्न, खून, वाळू उत्खनन यासारख्या गुन्हेगारी कारवाया पूर्णपणे थंडावल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था  अबाधित राहण्यास मदत झाली होती.

राज्य शासनाने चौथा लॉकडाउन 31 मे रोजी संपुष्टात आणणार असल्याचे यापूर्वीच घोषित केले होते. 1 जूनपासून जवळपास सर्वच दुकाने निर्धारित वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने दि. 30 मे रोजी धोम, ता. वाई येथे कृष्णा नदी पात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक करणार्‍या दोघांवर गुन्हे दाखल करून 25 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 31 मे रोजी कुरवली खुर्द, ता. फलटण येथे अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. या कारवाईत 8 जणांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांनी लॉकडाउन संपुष्टात आल्यानंतर लगेच जिल्ह्यात वाळू माफियांनी आपले डोके वर काढले असल्याचे स्पष्ट होत आहे.

या दोन घटना ताज्या असतानाच देगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत एका 25 वर्षीय युवकाचा अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली. ज्याचा खून झाला आहे, त्याची ओळख पटत नसल्यामुळे या घटनेतील आरोपीपर्यंत पोहचण्यात पोलिसांना अडचणी येत असतानाच दि.3 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान सातारा पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच दोघांनी एकमेकांवर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्यामुळे या घटनेमुळे पुरता जिल्हा हादरून गेला आहे. हा खून पोलीस ठाण्यातच झाल्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची, कायद्याची अजिबात भीती वाटत नसल्याचे या घटनेने निमित्त स्पष्ट होऊ लागले आहे. पोलीस ठाण्यात खून होणे, ही सातारा जिल्ह्यातील बहुधा पहिलीच घटना असल्यामुळे यानंतर पोलिसांना कोरोना पाठोपाठ जिल्ह्यातील क्राइम रेट थांबविण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.
Previous Post Next Post