शरद पवार आजपासून दोन दिवस कोकण दौर्‍यावर
स्थैर्य, मुंबई, दि. 8 : निसर्ग चक्रीवादळाने कोकणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस कोकण दौर्‍यावर जाणार आहेत. 9 जूनला रायगड आणि 10 जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील भागाची पाहणी करून शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.

दि. 9 रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईतून गाडीने प्रयाण करणार असून सकाळी 11.30 वाजता माणगाव, 12.30 वाजता म्हसळा, 1 वाजता दिवेआगर, 2 वाजता श्रीवर्धन, 4 वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक, सायंकाळी 5 वाजता हरिहरेश्‍वर आणि नंतर 6 वाजता बागमांडला मार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत.

दापोली येथे मुक्काम करणार आहेत. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीचे नेते खा. सुनील तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत. दि. 10 रोजी त्यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. या चक्रीवादळामुळे अनेक शेतकर्‍यांचे, आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा करून 100 कोटींची तातडीची मदत जाहीर केली. त्यानंतर रत्नागिरीला 75 कोटी व सिंधुदुर्गला 25 कोटीची तत्काळ जाहीर केली. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्यापासून दोन दिवस कोकण दौर्‍यावर जात आहेत. या दौर्‍यात ते शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड दौरा केल्यानंतर त्यांच्यात आणि शरद पवार यांच्यामध्ये एक तातडीची बैठक झाली होती. कोकणातल्या नुकसानग्रस्तांना पुन्हा कसे उभे करायचे यावर उभयतांमध्ये चर्चा झाली. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि इतर जिल्ह्यातील शेतीचे झालेले नुकसान कसे भरून काढायचे तसेच कोकणातल्या फळबागांना विशेष मदत देऊन या फळबागा उभ्या करण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याचे म्हटले जाते. आता या पार्श्‍वभूमीवर शरद पवारांच्या कोकण दौर्‍याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. आता शरद पवार कोकणवासीयांना काय भेट देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Previous Post Next Post