येळीव येथे तीन पाँझिटीव्ह सापडल्याने औंध परिसरात सन्नाटा
स्थैर्य, औंध, दि. २८ : औंध नजीकच्या येळीव येथे मुंबई रिटर्न तीन कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण सापडल्याने येळीवसह औंध परिसरातील गावे हादरली असून मुंबईवरून अस्थी घेऊन आलेले एकाच कुटुंबातील तिघे कोरोना पाँझिटीव्ह सापडल्याने येळीव गावाच्या सीमा सिल केल्या असून गावात घरोघरी आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे.

मंगळवारी भिवंडी मुंबई येथून एका मृत व्यक्तिच्या अस्थि विसर्जनासाठी कुटुंबातील  तिघेजण येळीव येथे आले होते. त्यानंतर त्यासर्वाना गावातच होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. कुटुंबातील 24वर्षीय एका मुलाला ताप आल्याने  तिघांना मायणी येथे मागील दोन दिवसांपूर्वी नेण्यात आले. शनिवारी रात्री उशीरा तिघांचे अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आल्याने येळीव गावात सन्नाटा पसरला होता. यामध्ये 24 व 26वर्षीय युवक तसेच 76 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हायरिस्क मधील एका व्यक्तीला मायणी येथे हलवले असून अन्य चौदा जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे.

रविवारी सकाळी शासकीय यंत्रणा गतिमान झाली. यावेळी तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी युनूस शेख, सपोनि उत्तम भापकर,  पोलीस पाटील विनोद थोरात सरपंच चंद्रकांत जगताप, ग्रामसेवक महेंद्र महामुनी,  आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाहणी करून गाव चौदा दिवसांसाठी  बंद केले आहे. गावातील सर्व दुकाने आर्थिक व्यवहार पूर्णपणे बंद केली आहेत.

आरोग्य कर्मचारी ,आशा सेविकांमार्फत घरोघरी आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे. गावात 270 कुटुंबे आहेत.
Previous Post Next Post