दोन अट्टल चोरट्यांना अटक, त्यांच्याकडून दोन चोरीच्या घटना उघडकीस
स्थैर्य, सातारा, दि. 10 : दोन अट्टल चोरट्यांना सातारा तालुका पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून दोन चोरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीतील 24 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. अर्जुन नागराज गोसावी (वय 32), रा. सैदापूर, ता.जि. साताऱा तर चोरीचा माल घेणारा चेतन प्रकाश साळवी (वय 33), रा. सदाशिव पेठ, सातारा याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे गुन्हे उघड करण्यासाठी पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी डी. बी. पथकास मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथकातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते.  सैदापूर गावच्या हद्दीत  रेकॉर्डवरील एक गुन्हेगार चोरीचा माल घेवून येणार असल्याची माहिती मिळाली. डी. बी. पथकाने सापळा रचून अर्जुन गोसावी यास ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास पोलीस खाक्या दाखवताच त्याने व त्याच्या दोन साथीदारांनी मिळून गडकर आळी येथे घरफोडी करून एक सोनी कंपनीचा एलईडी टीव्ही व साहित्य चोरून नेले होते. तो टीव्ही हस्तगत करण्यात आला. त्याची फिर्याद नानासाहेब चव्हाण यांनी दाखल केली होती तसेच जैतापूर येथील एका गोडावूनमधून कॉपर वायरचे 15 बंडल चोरून ते जाळून त्यातील तांब्याच्या वायरचे बंडल एका भांडी विक्री करणा़र्‍यास विकल्याचे सांगितले. त्याची चोरीची फिर्याद निशांत शहा यांनी दाखल केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजन हंकारे, डी. बी. पथकातील हवालदार दादा परिहार, पोलीस नाईक सुजित भोसले, सागर निकम, संदीप कुंभार, नितीराज कुंभार यांनी केली.
Previous Post Next Post