पुण्याच्या वाघोलीजवळ मित्रानंच मित्राचा केला खून
स्थैर्य, पुणे, दि. २६ : शहरातील वाघोलीजवळ मित्रानंच आपल्या मित्राला दगडानं ठेचून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारू पिताना जुन्या वादाचा राग काढत आरोपीनं आपल्या जुन्या मित्राला दगडानं ठेचून ठार केलं आहे. या घटनेनं वाघोली परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे.

वाघोली येथील चोखीदाणी रोडलगत दत्ता लक्ष्मण बडंगर असं मृत व्यक्तीचं नाव असून बिगारी काम करून दत्ता आपली गुजराण करायचा. दत्ता आणि त्याचा जुना आरोपी मित्र दारू पीत बसले असताना अचानक दोघांच्यात जुन्या वादावरून कडाक्याचं भांडण झालं होतं.

हा राग मनात ठेवून आरोपीनं आपल्या काही साथीदारांना बोलावून घेतलं. आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून दत्ताला एकटं गाठत दगडानं ठेचून मारलं. याप्रकरणी लोणिकंद पोलिसांनी तत्परता बाळगत आरोपींना मुसक्या आवळल्या आहेत.

लोणिकंद पोलिसांनी सागर कैलास पवार वय 27 आणि बालाजी किसन मोरे वय 29 या दोघा आरोपींना ताब्यात घेत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Previous Post Next Post