आगामी काळात गळीत हंगामात कारखान्यातून साडेसात लाख टन उसाचे गाळप करण्याचा संकल्प
स्थैर्य, खटाव, दि. २४ : गतवर्षी अनेक अडचणींचा सामना करत कारखान्याने जवळपास साडेतीन लाख टन उसाचे गाळप केले. यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस असून यापुढील काळात कारखाना क्षेत्रातील गावांना उरमोडी, टेंभू, जिहे-कठापूर या योजनांतून शेतीसाठी पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना मुबलक प्रमाणात उसाचे उत्पादन करण्यास वाव आहे. आगामी काळात गळीत हंगामात कारखान्यातून साडेसात लाख टन उसाचे गाळप करण्याचा आपला संकल्प आहे, असा विश्‍वास खटाव-माण तालुका अ‍ॅग्रो प्रा. लि., पडळ, ता. खटावचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त केला.

खटाव-माण अ‍ॅग्रो कारखान्याचे रोलर पूजन व गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संचालक बाळासाहेब माने, संचालक व कामगार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रोलरचे पूजन करण्यात आले.

घार्गे म्हणाले, गतवर्षी चांगला पाऊस झाला, त्यामुळे उसाचे उत्पादन चांगले झाले. यापूर्वीच पाणी तालुक्यात आले आहे. तारळी योजनेचे पाणी या भागातील कानकात्रे तलावात सोडण्यात येईल. कारखान्याची कोणतीही थकबाकी नाही. पहिल्या हंगामात तयार झालेली साखर महाराष्ट्रातील पहिल्या 3 कारखान्यांच्या साखरेच्या दर्जाप्रमाणे उत्पादित झाली आहे. योग्य नियोजन करून शेतकर्‍यांच्या उसाला योग्य भाव देण्यात येईल, असा प्रयत्न करण्यात येईल.

कारखान्याचे को-चेअरमन मनोज घोरपडे म्हणाले, गतवर्षी तोडणी वाहतूक यंत्रणा थोड्याफार प्रमाणामध्ये विस्कळीत झाली होती. तरीदेखील सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करून शेतकर्‍यांचे पैसे दिले होते. यावर्षी वाहतूक यंत्रणेत कोणतीही अडचण येऊ न देण्याची दक्षता घेतली जाणार आहे. सप्टेंबर अखेर कारखान्याची सर्व मेंटेनन्सची कामे पूर्ण होतील. गतवर्षी 2 हजार 500 रुपये दर देण्यात आम्ही यशस्वी झालो आहे.

कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे म्हणाले, गेल्या गळीत हंगामात जवळपास सव्वातीन लाख टन उसाचे गळीत करण्यात आले. गतवर्षी कारखान्यापुढे अनेक आव्हाने होती. काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या सर्वांच्या सहकार्यातून सोडवून नियोजित उद्दिष्टानुसार काम करण्याचा संकल्प आहे. यापुढे कारखान्याच्या माध्यमातून डिस्टिलरी प्रोजेक्ट सुरू करण्याचा कारखान्याचा प्रयत्न आहे. शेतकर्‍यांची सर्व बिले वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते म्हणाले, या भागातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आपला ऊस घालण्यासाठी जिल्ह्यातील इतर कारखानदारांच्या हातापाया पडावे लागत होते. मात्र पडळ येथे कारखाना सुरू झाल्याने शेतकर्‍यांना खराखुरा न्याय मिळाला आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांच्या उसास प्रथम प्राधान्य द्यावे.

कारखान्याचे जनरल मॅनेजर अशोक नलावडे यांनी प्रास्ताविक करून आगामी हंगामात करावयाच्या विविध बाबींबद्दल  उपस्थितांना कल्पना दिली. संजय घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मॅनेजर अमोल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Previous Post Next Post