गरीब व गरजु लोकांसाठी फलटण बाजार समितीचे विधायक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम; लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक शेतीमालाचे व्यवहार नियमित ठेवण्यात यश


स्थैर्य, फलटण : कोविड 19 संसर्गामुळे आजवरच्या लॉकडाऊन काळात फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हितास्तव घेतलेल्या विविध निणर्यांमुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि सेवा सुरु राहणेच्या दृष्टीने पुरवठा साखळी आणि वाहतूक सुरु ठेवणे शक्य झाले आहे. लॉकडॉऊनच्या कालावधीत शेतकर्‍यांच्या शेतीमालाला अधिकचा दर मिळवून देण्यासोबत दुर्बल घटकातील गरीब व गरजु लोकांसाठी विधायक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत आजही सुरु असल्याचे, बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी राज्याचे पणन राज्य मंत्री ना. शंभूराज देसाई यांना सांगितले. याबाबत सविस्तर माहिती देताना श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत फलटण बाजार समितीने जीवनावश्यक शेतीमाला खरेदी विक्रीचे व्यवहार नियमितपणे सुरु ठेवण्यात आम्हाला यश आले आहे. 

पणन राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई हे कोरोना बाबत आढावा घेण्यासाठी फलटण येथे आले असता ना. देसाई यांनी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या जय व्हील या निवासस्थानाला सदिच्छा भेट दिली. या बेटी दरम्यान श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी या विषयाबाबत सविस्तर निवेदन पणन राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांना दिले. या वेळी आमदार दीपक चव्हाण, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

लॉकडाऊनच्या काळात आजवर सुमारे 40 हजार क्विंटल शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले असून सदरील व्यवहारातून रु.8 कोटी रुपये संबंधीत शेतकर्‍यांना अदा करण्यात आले आहेत. 22 मार्च च्या जनता कर्फ्यु पासून आजअखेर एकही दिवस बाजार समितीमधील शेतमालाचे व्यवहार बंद राहिलेले नाहीत. शेतकरी केंद्रबिंदू मानून कामकाज करीत असताना कर्तव्याचा भाग म्हणून आम्ही ही सेवा अखंडपणे सुरु ठेवली असल्याचेही श्रीमंत रघुनाथराजे यांनी यावेळी सांगितले.

प्रशासकीय सूचनांचे काटेकोर पालन

बाजार समितीत रोज सुमारे दीड ते दोन हजार शेतकरी, आडते, खरेदीदार, हमाल, मापाडी आदी घटक येत असतात. त्यामुळे बाजार समितीत प्रत्यके ठिकाणी अनावश्यक गर्दी होऊ नये याची दक्षता घेवून बाजार आवारात वावरणार्‍या व्यक्ती किमान 3 फूट अंतरावर राहतील अशा पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये याकरिता बाजार समितीने दोन हजार बाजार घटकांना मास्क व दोन हजार लिटर पेक्षा अधिक सॅनिटायझर मोफत उपलब्ध करुन दिला आहे. तसेच हात धुण्यासाठी मुबलक पाणी व साबणाची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. बाजार समितीच्या परिसराची व परिसरातील सार्वजनिक स्वच्छता गृहाची रोजच्या रोज स्वच्छता, आवारात निर्जंतुकीकरण केले जात आहे. आवारात किरकोळ खरेदी करण्यासाठी येणार्‍यांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला असून आवारात येणार्‍या प्रत्येकाचे स्क्रिनिंग केले जात आहे. 100 डिग्री फॅरनहाईट पेक्षा जास्त तापमान असलेल्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येत आहे. बाजार समितीचेे परवानाधारक अडते, खरेदीदार, हमाल, मापाडी, मदतनीस यांची प्रत्येक मंगळवारी आरोग्य तपासणी करण्यात येत आहे, असेही श्रीमंत रघुनाथराजे यांनी सांगितले.

शेतकर्‍यांसाठी 24 तास सुविधा

पणन संचालकांच्या सूचनेनुसार शेतमालाची वाहतूक करणार्‍यांसाठी आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी 24 तास कालावधीसाठी वाहतुकीची प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देवून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आणि पुरवठा साखळी सुरु ठेवण्यास मदत झाली. तसेच शेतकर्‍यांसाठी 72199001900 ही 24 तास सुरु करण्यात आलेली फार्मस हेल्पलाईन अल्पावधीत लोकप्रिय ठरल्याचे, श्रीमंत रघुनाथराजे यांनी सांगितले.

‘मोफत फिरता दवाखाना आपल्या दारी’ उपक्रम

बाजार समितीने दोन वर्षापूर्वी शेतकरी हितास्तव सुरु केलेल्या काडीयाक स्नेकबाईट अ‍ॅम्बुलन्समार्फत फलटण तालुक्यातील 127 गावांत व शहरातील 90% परिसरात नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी करर्‍यात आली असून सुमारे 14 हजार 277 लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. बाजार समितीच्या आरोग्य समितीच्या माध्यमातून सदरील उपक्रम नागरिकांच्या दारी जावून राबवला जात असून या उपक्रमासाठी फलटण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रांत पोटे यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचेही श्रीमंत रघुनाथराजे यांनी आवर्जून सांगितले.

शिवभोजन थाळी व मालोजी शिदोरीच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था

लॉकडाऊन काळात लाभार्थ्यांकडून विनामोबदला दैनंदिन सरासरी 150 शिवभोजन थाळी व मालोजी शिदोरी अंतर्गत साधारणत: 50 ते 100 असे एकूण रोज 200 ते 250 थाळी गरीब, गरजूंना उपलब्ध करुन देण्यात आल्या. सुमारे 22 हजार हून अधिक लोकांना या उपक्रमांतर्गत मोफत भोजन देण्यात आल्याचे श्रीमंत रघुनाथराजे यांनी सांगितले.

पोलीस व महसूल कर्मचार्‍यांना मदत

आवश्यक सेवा म्हणून काम करीत असलेल्या पोलीस व महसूल विभागातील सुमारे 300 अधिकारी व कर्मचार्‍यांना मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले असून फलटण येथे ड्युटीवर असलेल्या पोलीसांना चहा, नाष्टा व दोन वेळेची जेवणाची सोय आजही सुरु असल्याचे श्रीमंत रघुनाथराजे यांनी सांगितले.

स्थलांतरित मजूंना विशेष मदत

तामिळनाडू व पश्‍चिम बंगाल येथील स्थलांतरीत मजूरांना त्यांचे मूळ गावी फलटण येथून पाठवणेत आले. माझ्या मानधनातून त्यांना सेंड ऑफ भोजनही देण्यात आले. तसेच स्वखर्चातून व फलटण तालुका बिल्डर्स असोसिएशन आणि कमिन्स इंडिया फौंडेशनच्या माध्यमातूनही त्यांना सहकार्य करण्यात आल्याचे, श्रीमंत रघुनाथराजे यांनी सांगितले.

तसेच बाजार समितीच्या माध्यमातून सुमारे 1हजार कुटूंबांना असेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे मोफत वाटप, कोरोना जनजागृतीसाठी शेतकर्‍यांशी थेट संवाद, इतर बाजार समित्यांमध्ये डाळींब व कांद्याचे लिलाव बंद असतानाही या शेतमालाच्या खरेदी - विक्रीचे यशस्वी व्यवहार, शेतकर्‍यांसाठी समस्या निवारण विशेष कक्ष, नगरपरिषदेच्या अन्नछत्रास मदत, नगरपरिषदेच्या सहकार्याने घरपोच धान्य, फळे व भाजीपाला उपक्रम राबवून शहरातील 60 हजार लोकांना याचा लाभ देण्यात आला असल्याचेही श्रीमंत रघुनाथराजे यांनी स्पष्ट केले.

हे सर्व उपक्रम राबवत असताना व अत्यावश्यक सेवा म्हणून कामकाज करीत असताना बाजार समितीचे कर्मचारी पहाटे 5:30 पासून शिफ्टमध्ये काम करत आहेत. सर्वांच्यात योग्य समन्वय असल्याने शेतमाल विक्रीची सेवा सुरु ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. या कार्याबद्दल बाजार समितीशी संबंधित सर्व घटकांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून संबोधले जावे, अशी अपेक्षाही श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सर्व संचालकांच्या सूचनेनुसार बाजार समितीने कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून जीवनावश्यक शेतमाला खरेदी विक्रीचे व्यवहार नियमितपणे सुरु ठेवून सक्षम आणि पणन व्यवस्था देत गरीब, गरजू लोकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत ‘मार्केट फॉर ऑल’ या संकल्पनेतून सर्व व्यवहार सुरळीत ठेवले आहेत, असे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले.
Previous Post Next Post