नागपंचमीवर कोरोनाचे संकट
स्थैर्य, सातारा, दि. २३ : कोरोना असो नाही तर आणखी कुठले संकट, भारतीय संस्कृती, परंपरा भिनल्याने या महामारीतही नागरिकांनी सण, उत्सव साजरे करणे सोडले नाही. त्यामुळे नागपंचमी सण साजरा होईलही, पण नागपंचमीला घराघरांच्या अंगणात झिम्मा-फुगडीचे खेळ सोशल डिस्टन्सिंग व संचारबंदीमुळे रंगणार नाहीत.

दरम्यान, शनिवारच्या (दि. 25) नागपंचमीस पूजनासाठी लागणारे नागोबा तयार करण्याचे काम गावागोवी कुंभारवाड्यांमध्ये गतीने सुरू आहेत. कलाकारांचे कुटुंब नागोबांना रेखण्यात रमून गेले आहे. नागपंचमी हा महिलांचा जिव्हाळ्याचा सण. घरोघरी हा सण नेहमीच उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी नागाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. त्यासाठी कुंभारवाड्यात नागोबा तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. आता बहुतेक कलाकार नाग तयार करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करतात. त्याला रंग देऊन आकर्षक रूप देतात. त्याची किंमत पाच रुपयांपासून पुढे असते.

राजवाडा परिसर, मोती चौक, पोवई नाका, बस स्थानक परिसरात हे विक्रीस ठेवले जातात. यावर्षी ते संचारबंदीच्या परिस्थितीवर अवलंबून असणार आहे. ग्रामीण भागात नदी, तलावाच्या गाळाच्या मातीपासून विशिष्ट समाजातील नागरिक नागोबा तयार करून घरोघरी धान्य व पैशाच्या मोबदल्यात देतात.
Previous Post Next Post