सदोष बियाणे उगवण तक्रारींबाबत भरपाई मिळण्यास सुरुवात
पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात धनादेशांचे वाटप : महाविकास आघाडी शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

स्थैर्य, अमरावती, दि. ९ : सदोष बियाण्यामुळे पिकाची उगवण न झाल्याच्या शेतकरी बांधवांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित कंपन्यांकडून तातडीने नुकसानभरपाई मिळण्यास सुरूवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ११ शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप आज करण्यात आले.

कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांना कोरोना संकटकाळाबरोबरच विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, त्यावर निर्धाराने मात करून पुढे जात नवनव्या योजना, उपक्रमांना शासन चालना देत आहे. महाविकास आघाडी शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी असून, प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाला भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 11 शेतकऱ्यांना 78 हजार 450 रूपये इतक्या भरपाईचे वाटप झाले. जि. प. माजी सभापती जयंतराव देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

एकही शेतकरी वंचित राहता कामा नये

कोरोना संकटामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांपुढे सदोष बियाण्यामुळे आणखी अडचण उभी राहिली आहे. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई तत्काळ मिळाली पाहिजे. त्यामुळे तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांमार्फत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी वेळेत करावी व सदोष बियाण्याबाबत तत्काळ भरपाईचे वाटप व्हावे. एकही शेतकरी बांधव वंचित राहता कामा नये. नुकसानभरपाई न देणा-या कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

जिल्ह्यात एकूण 2 हजार 595 सोयाबीन उगवण न झाल्याबाबत तक्रारी तालुका स्तरावर प्राप्त झाल्या असून, त्यापैकी 1 हजार 554 तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडून पाहणी झालेली आहे. यामध्ये सदोष बियाण्याबाबत कंपनीने 901 बॅग व 22 लक्ष 76 हजार 445 रूपये भरपाई 489 शेतकऱ्यांना दिलेली आहे. उर्वरित तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पाहणी सुरू आहे. कंपनी व कृषी सेवा केंद्रामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची कार्यवाही होत आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी श्री. चवाळे यांनी दिली.

याबाबत पालकमंत्री म्हणाल्या की, पंचनामा प्रक्रियेला वेग मिळाला पाहिजे. त्यासाठी तपासणी पथकांची संख्या वाढवावी. ज्या शेतकरी बांधवांनी महाबीजचे बियाणे पेरले व ते उगवून आले नाही अशा तक्रारीची तातडीने दखल घेऊन तपासणी अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाने महाबीजला यापूर्वीच दिल्या आहेत. महाविकास आघाडी शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहे. 

प्रशासन व अधिकारी वर्गाने स्वत: पाठपुरावा करून पंचनाम्यानुसार कंपन्यांकडून भरपाई दिली जाते किंवा कसे, याचा पडताळा घ्यावा. कंपन्यांकडून कुठेही हयगय होत असल्याचे आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करावा , असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उमेश कडू (खुलताबाद, ता. दर्यापूर) यांना 10 हजार 400 रूपये, श्यामभाऊ देशमुख (मोझरी ता. तिवसा) यांना 28 हजार 600 रूपये, दर्यापूर येथील अशोक घुरडे यांना 13 हजार रूपये, खोलापूर (ता. भातकुली) येथील नामदेव खंडारे व सुरेश मोतीराम इंगळे यांना प्रत्येकी साडेचार हजार रूपये, तर निरूळगंगामाई (ता. भातकुली) येथील उमेश घोडे यांना 2250 रु., अंजनगाव बारी येथील श्रीकृष्ण भोपळे, सुधीर दातीर, आरिफ शे. रुस्तम, दीपक जाकड, पांडुरंग खडसे यांना प्रत्येकी 2200रू. भरपाई देण्यात आली.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.