ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांची साक्षात वाङ्मयी मूर्ती : ह भ प डॉ रविदास महाराज शिरसाठ
स्थैर्य, श्री क्षेत्र आळंदी / सूर्यकांत भिसे, दि. ३० : संतसम्राट माऊली श्रीज्ञानोबारायांच्या सिद्ध व ओजस्वी वाणीतून साकारलेला आणि मराठी सारस्वताला सर्वार्थाने व सर्वांगाने परिपूर्ण एवं समृद्ध करणारा ग्रंथराज म्हणजे ज्ञानेश्वरी होय. ज्ञानेश्वरी हा केवळ ग्रंथ नसून ती ज्ञानोबारायांची साक्षात वाङ्मयी मूर्ती आहे. त्या ज्ञानेश्वरीचा सारभूत, निष्कर्षात्मक भाग म्हणजे अठरावा अध्याय होय. गंगेचे पात्र समुद्राला मिळतेवेळी जसे विस्तीर्ण होते, तद्वत ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात ज्ञानोबारायांच्या नवोन्मेषशालिनी प्रतिभेचे विशाल स्वरुप पहावयास मिळते असे मत ह भ प डॉ रविदास महाराज शिरसाठ यांनी व्यक्त केले .

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफएम इंडिया रेडिओ यांच्या वतीने " पालखी सोहळा पत्रकार संघ " या फेसबुक पेजवर दररोज सायंकाळी ४ वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( मंगळवार ) अठराव्या दिवशी श्री क्षेत्र आळंदी जि पुणे येथील ह भ प डॉ रविदास महाराज शिरसाठ यांनी सर्वगीतार्थसंग्रहयोग या अठराव्या अध्यायावर निरुपण केले.

डॉ शिरसाठ म्हणाले , अठराव्या अध्यायारंभी ज्ञानोबारायांनी परमात्मतत्त्व व श्रीगुरु यांना अभेदत्वाने केलेले उपसंहारात्मक मंगल हे त्यांच्याठायी असणा-या सकलशास्त्रसंपन्नता, नवोन्मेषशालिनी प्रतिभासंपन्न कवित्व, संस्कृतभाषा व्युत्पन्न पांडित्य, इत्यादि असाधारण गुणवर्यांबरोबरच परतत्त्वस्पर्श दर्शनही त्यातून घडविते. निर्मळ, मंगळ, प्रबळ, स्वप्रभ, विशुद्ध, अद्वितीय इ. स्वरुपाचे सामर्थ्ययुक्त वर्णन करुन त्याचा जयजयकार करतात. समर्पक, दर्जेदार शब्दयोजना आणि त्यातून साधलेली शब्द-अर्थ-भावाची परमोत्कटता अभिलक्षुन ज्ञानेश्वरी भावपराग सेवन करणारे द्विरेफ त्यात गुंतून राहिले नाहीत तर नवलच! ए-हवी शब्दातीत असणा-या परमतत्त्वाचे उपमारुपकादि अलंकार व दर्जेदार विशेषणांनी वर्णन करताना उद्भवणा-या समस्यांची रुखरुख संवेदनशील कविमनाला वाटल्याशिवाय रहात नाही. यास्तव मौनानेच वर्णन करणे बरे, अशा विचारापर्यंत ते येतात.

यापुढे अठराव्या अध्यायाचे महत्व सांगून पूर्वाध्याय संगती सांगतात. ब्रह्मनामाच्या सहाय्यावाचून कर्मे केली तर मोक्षही नाही, आणि कर्म असांग राहिल्याने अधोगती ठरलेली. म्हणून ही कर्मबाधा चुकवण्यासाठी अर्जुनाने त्याग व संन्यास समजून सांगण्याविषयी देवाला विनंती केली, त्यातून अठरावा अध्याय निर्माण झाला. भगवंत सांगतात, त्याग आणि संन्यास हे दोन्ही शब्द तसे पाहता एकार्थीच वाटतात, पण त्यात सूक्ष्म भेद आहे.

जे निपटुनि कर्म सांडिजे।
ते सांडणे संन्यासु म्हणिजे।
आणि फलमात्र का त्यजिजे।
तो त्यागु गा।।

परंतु कोणते कर्म करावे व कोणत्या कर्माचे फळ टाकावे, हेही कळणे आवश्यक आहे. नित्यनैमित्तिक कर्मे अवश्य करणीय आहेत. काम्य (व निषिद्ध) कर्मे करूच नयेत. याविषयी मतमतांतरांची चर्चा करुन भगवंत आपला निश्चय तेथे सांगतात, यज्ञ दान तप ही कर्मे कर्तृत्वमद व कर्मफलास्वाद टाकून करावीत.

या विवेचनात त्यागाचे तीन प्रकार (तामस, राजस व सात्विक) सांगतात. कर्म हे जीवाच्या जन्मादि अनर्थ परंपरेस कारणीभूत असल्याने या कर्मपाशातून मुक्त होण्यासाठी
जे मुक्ताते निर्धारिता। लाभे आपुलीच मुक्तता।...
हा उपाय सांगतात. पुढे

यस्य नाहंकृतो भावो...

या श्लोकावरील टिकेत मुक्त पुरुषाच्या अनुभूतीचे विस्तृत वर्णन करुन या आत्मस्थितीच्या राजाकडून कोणतीही कर्मे घडली तरी तो स्वरूपस्थ महापुरुष त्यांनी लिप्त होत नाही असे स्पष्ट करतात.
म्हणोनि आत्मयाचे केवळ।
जो रूपचि जाहला निखिळ।
तया नाही बंदीशाळ। कर्माची हे।।

यापुढे ज्ञान ज्ञाता ज्ञेय या कर्मप्रवृत्तित्रयाचे वर्णन करुन ज्ञान कर्म व कर्ता या तिहींचे सत्वादि गुणांच्या अनुषंगाने होणारे तीन तीन प्रकार सांगतात. कर्म करण्याचा निश्चय करणारी बुद्धी व ते तडीस नेणारे धैर्य यांचेही त्रिगुणानुरुप वर्णन करुन, कर्माचे (अनुकूल) फळ जे सुख त्याचेही सात्विक, राजस व तामस या भेदाने वर्णन करतात.

या जगात तीन गुणांपासून मुक्त असे काहीच नाही. देव, त्रिलोक, चतुर्वर्ण हे सर्व या तीन गुणांचाच प्रताप आहे. चतुर्वर्णियांनी स्वधर्माचरण करणे हीच त्या सर्वात्मक ईश्वराची सेवा होय. याच सेवेतून पुढे 'कर्मसाम्यदशा' साधली जाऊन श्रीगुरु कृपेने 'नैष्कर्म्य स्थिती' पर्यंत मजल जाते. ही स्थिती क्वचित् एखाद्याला श्रीगुरु कृपेने प्राप्त होते, परंतु काहींना हे पद क्रमाक्रमाने प्राप्त करुन घ्यावे लागते.

बुद्ध्या विशुद्धया युक्तो.. पासून
भक्त्या मामभिजानाति..

पर्यंत या पाच श्लोकावरील विवेचनात तो साधक साधनाक्रमाने सहज स्थितीला अर्थात् भक्तीला प्राप्त होतो असे सांगतात. पुढे याच 'अकृत्रिम भक्तीचे' वर्णन,
तैसी क्रिया कीर न साहे। तरी अद्वैती भक्ती आहे।
हे अनुभवाचि जोगे नव्हे। बोला ऐसे।।

या शब्दात करतात. या अभिन्न स्थितीत स्वभाववशात् त्यांच्या संघाताकडून जी जी क्रिया होते ती भगवंताच्या महापूजेत जमा होते.

आज ज्ञानेश्वरीची सांगता
उद्या बुधवार दि १ जुलै रोजी ह भ प डॉ रविदास महाराज शिरसाठ हे श्री ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचा उत्तरार्ध सांगतील व गेली अठरा दिवस सुरु असलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी निरुपणाची सांगता होइल . या कार्यक्रमाचे निवेदन ह भ प स्वामीराज भिसे यांनी केले .

माऊली पंढरपूरकडे मार्गस्थ
दरम्यान आज पहाटे पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते माऊलीची पूजा , अभिषेक व आरती झाली . सकाळी धोंडोपंत दादा अत्रे यांच्या वतीने कीर्तनाची सेवा झाली . दुपारी एक वाजता माऊलींच्या पादुका सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे देण्यात आल्या . त्यांनी या पादुका शासनाने दिलेल्या एस टी बसमध्ये ठेवल्या . बस मध्ये माउलींसाठी सुंदर आसन करण्यात आले होते . पुंडलिक वरदा हरी विठ्ठलच्या गजरात व माऊली माऊली नामाच्या जयघोषात माऊलींच्या पादुका एस टी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या .
Previous Post Next Post