दिवशी घाटात चिकनची घाण टाकल्याने परिसरात दुर्गंधी
स्थैर्य, पाटण, दि. २३ : ढेबेवाडीपासून पाटणला जोडणार्‍या दिवशी घाटामध्ये दत्त मंदिरापासून जवळच चिकन व्यावसायिक कोंबड्यांची पंखे व चिकनची अनावश्यक घाण टाकत असल्याने घाटामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. येथे भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे घाटातून येणार्‍या- जाणार्‍या लोकांना त्रास होवू नये साठी यासाठी व्यावसायिकांनी चिकनची घाण घाटात न टाकता त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी लोकांमधून होत आहे.

दिवशी घाटामध्ये चिकनची घाण टाकली जात असल्याने येथे मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणात येत असतात. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहनांवर तसेच चालत जाणार्‍या लोकांवर धावून जात आहेत. घाटामध्ये सुतारवाडी, वडजाईनगर येथील लोक गुरे चरण्यासाठी नेहमीच असतात. यामध्ये महिला व मुलांचे प्रमाण जास्त असते. त्यांच्यावर ही कुत्री हल्ला करू शकतात अशी भीती लोकांमध्ये आहे.

दुचाकीवरून ढेबेवाडी, तळमावले, कुंभारगाव, काळगांव विभागातून पाटण या ठिकाणी शासकीय कामानिमित्त जाणार्‍या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही कुत्री सातत्याने दुचाकीवरून जाणार्‍यांच्या पाठीमागे लागतात. अशावेळी जर एखाद्याचा अपघात झाल्यास जाबाबदार कोण असा सवाल प्रवाशांमध्ये निर्माण होत आहे. सदर ठिकाणी कचरा टाकणार्‍या चिकन व्यावसायिकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Previous Post Next Post