कचराकुंड्या फुल्ल, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
स्थैर्य, सातारा, दि. २४ : सातारा शहरातील बुधवार पेठ चौकात असणार्‍या कचरा कुंड्या कचर्‍याने ओसंडून वाहात आहेत. कचराकुंडीजवळ  श्‍वानांच्या झुंडीच्या झुंडींचा वावर असल्यामुळे तो कचरा रस्त्यावर विखुरला जात आहे. परिणामी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सातारा नगरपालिकेने येथील कचरा दररोज उचलून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्या चार वर्षात सातारा शहरात कचर्‍याची गहन समस्या निर्माण झाली आहे. कचरा उचलण्यासाठी नवीन घंटागाड्यांची खरेदी करूनही या समस्येचे निराकरण झाले नसल्यामुळे शहरातील बहुतांश कचराकुंड्या ओसंडून वाहात असल्याचे चित्र सातत्याने पाहायला मिळते. प्रसिद्धीमाध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवस कचरा उचलला जातो. नंतर नगरपालिकेचा आरोग्य विभाग ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी भूमिका बजावत असल्यामुळे सातारकरांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. राधिका चौक ते बसस्थानक जाणार्‍या मार्गावर बुधवार पेठ चौकात सातारा नगरपालिकेने कचरा टाकण्यासाठी कुंड्या ठेवल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या कचराकुंड्यांजवळ श्‍वानांच्या झुंडीच्या झुंडींचा वावर आहे. संबंधित श्‍वानं कचराकुंडीवर चढून खायला काही मिळते का याचा शोध घेत असल्यामुळे कचरा खाली पडत आहे. हाच कचरा मुख्य मार्गावर येत असल्यामुळे येथून दुचाकी व चारचाकी वाहने चालवणे फार मुश्कील होत आहे. हा कचरा रस्त्यावर येत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

मंगळवारपर्यंत सातार्‍यात लॉकडाउन असल्यामुळे कचरा उचलण्याच्या कामावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसातून एकदा या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत असल्यामुळे कचराकुंड्या कचर्‍याने ओसंडून वाहात आहेत. सकाळच्या वेळी या रस्त्यावरून फिरायला जाणार्‍या नागरिकांना नाकाला रूमाल लावून चालत जावे लागत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुर्गंधी पसरल्यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दररोज येथील कचरा उचलून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बुधवार पेठ, राधिका चौक, ऐक्य प्रेस कॉर्नर या परिसरात श्‍वानांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. श्‍वानांच्या झुंडी रस्त्यांवरून फिरत असल्यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिकांमध्ये दहशतीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या श्‍वानांचा  सातारा नगरपालिकेने वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya