राज्यात पोलीस यंत्रणेच्या मदतीला होमगार्डचा फोर्स देणार : ना. शंभूराज देसाई


स्थैर्य, फलटण : कोविड १९ चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जाहिर केलेल्या लॉक डाऊनचा पहिला टप्पा जनतेच्या सहकार्याने यशस्वी झाला आहे. सातारा जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात उत्तम समन्वयाने काम सुरु आहे. राज्यात पोलीस यंत्रणेच्या मदतीला होमगार्डचा फोर्स देण्यात येणार असून जिल्ह्यात चारशे होमगार्ड पोलीस यंत्रणेच्या मदतीला देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अर्थ व  गृह राज्य मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

फलटण पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करोना नियंत्रण व शासकीय कामकाजाच्या आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ना. देसाई बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप,  उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे उपस्थित होत्या.

लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील प्रशासन व नागरिक यांना असुविधा, त्रुटी जाणवत आहेत काय याची माहिती घेण्यासाठी जिल्हास्तरीय दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे ना. देसाई यांनी प्रारंभी स्पष्ट केले.

फलटण येथील परिस्थितीची आपण पाहणी केली असून ती आपणास समाधानकारक जाणवली आहे. येथील कोव्हीड केअर सेंटरची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, नगर परिषद प्रशासनाने त्याचे नियोजन  केल्याचे नमूद करीत फलटण तालुक्यात २८५ रुग्णांना उपचार देण्याची सोय आहे, परंतू जर भविष्यात यामध्ये वाढ करावी लागली तर त्या दृष्टीने जागा पाहण्याच्या व निवडण्याच्या सूचना आपण राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत व त्यांनी त्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत असे सांगून येथील प्रांताधिकारी त्याबाबत योग्य निर्णय निश्चित घेतील याची खात्री ना. देसाई यांनी व्यक्त केली. 

सर्वत्र धान्य पुरवठा सुरळीत सुरु आहे. आरोग्य केंद्रावर औषध साठा आहे. ग्रामीण रुग्णालयात राज्य सरकारच्या आरोग्य संचलनालयाकडून येणारा औषध पुरवठा मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर ज्या काही सुविधा लागणार आहेत त्या लोकांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने तत्पर ठेवण्याचे काम प्रशासनाने उत्तमरित्या केले आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या मध्ये चांगल्या समन्वयाने काम सर्वत्र सुरु असल्याचे ना. देसाई यांनी निदर्शनास आणून दिले.

लॉक डाऊन काळात शासन आदेश असतानाही बऱ्याच संस्था बँका या बळजबरीने कर्जवसुली करीत असल्याबाबत  विचारणा केली असता कर्जवसुलीस ना नाही परंतू जर कोणी बळाचा वापर करीत असेल तर ते चुकीचे आहे. जर असा प्रकार कोठे घडत असेल तर माझ्याशी थेट संपर्क साधावा त्याबाबत चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल, याची ग्वाही ना. देसाई यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री ना.  बाळासाहेब पाटील  जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कि एका तालुक्याचे असा सवाल उपस्थित करताच  पालकमंत्री लॉकडाऊन काळात उत्तम काम करीत आहेत. सध्या मी व त्यांनी कामाचे व भागाचे नियोजन वाटून घेतले असून त्या पद्धतीने ते चांगले काम करीत आहेत. असे सांगत ना. देसाई यांनी पालकमंत्र्यांची बाजू उचलून धरली.

भाजपा सरकारच्या काळात सातारा जिल्ह्यातील प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाले होते, ती त्रुटी भरुन काढण्यासाठी तुम्ही आता अर्थ राज्य मंत्री म्हणून जिल्ह्याकडे लक्ष देणार का ? या बाबत  विचारले असता सन २०२० - २०२१ च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व आपण बसून सातारा जिल्ह्याबाबत विशेष चर्चा करुन सातारा जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी भरीव निधी मंजूर केला आहे, परंतू कोव्हीड १९ मुळे राज्याच्या अर्थसंकल्पातील ३३ % निधीचा वापर करायचा आहे व त्यातील १० % निधी कोव्हीड १९ साठी वापरायचा आहे, तथापी कोविड परिस्थिती निवळल्यानंतर कुठलाही प्रकल्प निधी अभावी रखडणार नाही याची ग्वाही ना.शंभूराज देसाई यांनी स्पष्ट शब्दात दिली.


ना. शंभूराज देसाई, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. दीपक चव्हाण यांची कमरा बंद चर्चा 

गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांची फलटण येथील बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात कमरा बंद चर्चा झाली त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या मात्र या बाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विचारले असता त्यांनी हि भेट सदिच्छा भेट असून ना. शंभूराज देसाई व आपले खूप जुने सबंध आहेत, ह्या भेटीचा कोणताही गैरअर्थ काढू नये असे त्यांनी स्पष्ट केले. 

ना. शंभूराज देसाई यांची श्रीमंत रघुनाथराजे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

ना. शंभूराज देसाई यांनी बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट या भेटीत या भेटी दरम्यान श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व ना. शंभूराज देसाई यांच्यात विविध विषयावर चर्चा झाली. जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. ना. देसाई यांचे आजोबा स्व. बाळासाहेब देसाई व श्रीमंत रघुनाथराजे यांचे आजोबा स्व. श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या कार्यकाळातील काही गोष्टीबाबत चर्चा ही झाली यावेळी आमदार दीपक चव्हाण, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे उपस्थित होते.
Previous Post Next Post