फलटण शहर व तालुक्यात २२० करोना पॉझीटिव्ह : १२१ बरे होऊन घरी


स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यात आतापर्यंत करोना बाधीतांची संख्या २२० असून त्यापैकी १२१ बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहेत, ८९ व्यक्तींवर उपचार सुरु असून १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये फलटण शहरातील ६४ बाधीतांचा समावेश आहे, त्यापैकी २८ बरे होऊन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे, तर ३३ जणावर उपचार सुरु असून ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शिस्तपालन व एकजुटीतून करोना नियंत्रण

फलटण शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येने लोक उद्योग, व्यवसाय, नोकरी निमित्ताने पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात स्थायिक आहेत, या मोठ्या शहरात करोना फैलाव नियंत्रणाबाहेर असताना फलटण शहर व तालुक्यात करोना पोहोचलाही नव्हता, त्यानंतर थोडी सुरुवात झाली. मात्र पुण्यामुंबईतील स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर आपलीच पुण्यामुंबईतील मंडळी सुरक्षीत ठिकाण म्हणून गावाकडे आपल्या घरी दाखल होऊ लागली, त्यावेळी धोका ओळखून प्रशासन आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत, ग्रामस्थ व अन्य यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून या सर्व लोकांना पास काढून आपली योग्यप्रकारे आरोग्य तपासणी करुन येथे येण्याची विनंती केली, ती या सर्वांनी स्वीकारुन त्याचे काटेकोर पालन केल्याने योग्य नियोजन करुन या सर्व लोकांना होम क्वारंटाइन किंवा गावातील सार्वजनिक ठिकाणी क्वारंटाइन करुन त्यांची निवास, भोजन व्यवस्था, नियमीत आरोग्य तपासणी करण्यात आल्याने या आजाराचा फैलाव होणार नाही याची दक्षता घेण्यात आली, परिणामी सर्व १२७ गावे व फलटण तालुक्यातील १४ हजार + शहरातील ९ हजार कुटुंबातून केवळ २१८ व्यक्ती पॉझीटिव्ह आल्या त्यापैकी १२१ बऱ्या होऊन त्यांना घरी पाठविण्यात आले, हे सर्व प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि लोकांच्या उत्तम समन्वय, शिस्तपालन, प्रशासनाने घालुन दिलेल्या नियम, निकष यांची अंमलबजावणी यामुळेच घडले आहे.

महामारी तालुक्यातून हद्दपार होणार

आता या महामारीने वेग घेतला असला तरी आपली सर्वांची एकजूट कायम ठेवून प्रशासनाने घालुन दिलेले नियम, निकष यांची व्यवस्थित अंमलबजावणी करा, शक्यतो घराबाहेर पडू नका, मास्क सॅनिटायझर वापरा, गर्दी टाळा महामारीला फलटण शहर व तालुक्यातून निश्चित हद्दपार व्हावे लागेल.

अधिकारी/कर्मचारी यांचे योगदान

प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. धवन, डॉ. सुभाष गायकवाड, तालुका आरोग्यधिकारी डॉ. पोटे, पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्यासह महसूल, पोलीस, आरोग्य व अन्य शासकीय यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, गाव पातळीवर पोलीस पाटील, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, परिचारिका, कोतवाल वगैरे प्रशासनातील सर्व घटकांनी केलेले काम निश्चित सेवा वृत्तीचा आदर्श जपणारे आहे, किंबहुना त्यामुळेच सर्वांच्या एकजुटीतून फलटण शहर व तालुक्यात करोना नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे.

 मोठे आर्थिक नुकसान मात्र कोणीही विचलित नाही

या कामात विविध व्यावसायिकांचे, नोकरदारांचे, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अनेकांना आपले व्यवसाय बंद राहिल्याने बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, बेरोजगार झालेल्यांची अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही, छोटे व्यावसायिक अक्षरशः हतबल झाले आहेत त्यांनीही करोना हद्दपारीला साथ करताना सार्वजनिक आरोग्य रक्षणाला प्राधान्य दिल्याचे नाकारता येणार नाही, आगामी ४/६ महिन्यांपर्यंत ही एकजूट आणि एकवाक्यता सांभाळावी लागणार आहे तरच करोना या तालुक्यातून हद्दपार होईल याची नोंद घेऊन सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.

सर्वस्तरावरुन मदतीचा ओघ

या कालावधीत नगर परिषद किंवा प्रशासनातील अधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार अनेकांनी केलेली धान्य, जीवनावश्यक वस्तू, किराणा, कपडे, रोख स्वरुपातील मदत निश्चित प्रेरणादायी ठरत आहे, काहींनी अन्नछत्र चालवून गरजूंना केलेला अन्न पुरवठा, काहींनी परप्रांतीयांना त्यांच्या घरी पाठविताना किंवा त्यांच्या निवास भोजन व्यवस्थेसाठी केलेली आर्थिक मदत असेल, गरजे प्रमाणे करोना केअर सेंटर व अन्य रुग्ण व्यवस्थेसाठी कॉट्सस, त्यावरील गाद्या, चादरी, उशा यासाठी केलेली मदत असेल एक ना अनेक मार्गाने स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी, सहकारी संस्था, गणेशोत्सव मंडळे, तरुण मंडळे, क्रीडा मंडळे यांनी या कामी मोठी मदत केली असल्याने हे सर्व शक्य झाले आहे.

फलटणची एकजुट डगमगणार नाही

गरीब, गरजू, बेरोजगार वगैरे घटकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यातही अनेकांनी पुढाकार घेतला त्यातून अनेकांच्या रोजी रोटीला मदत झाली आहे. एकूणच करोनाने सर्व समाज घटकांची एक जुट अधिक भक्कम केल्याने यापुढे कसल्याही संकटात फलटण डगमगणार नाही हे नक्की.
Previous Post Next Post