महाबळेश्‍वर अर्बन बँकेच्या कर्ज योजनेचा सभासदांनी लाभ घ्यावा : कुंभारदरे
स्थैर्य, महाबळेश्‍वर, दि. 21 : कोविड 19 च्या आक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात रोजगाराअभावी सभासदांची चूल बंद होवू नये म्हणून महाबळेश्‍वर अर्बन बँकेने सुरू केलेल्या खास कर्ज योजनेसाठी 2 कोटी तर उद्योगधंदा सुरू करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये कर्ज वितरणासाठी 3 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ज्या सभासदांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केला नसेल त्यांनी त्वरित कर्ज मागणीचा अर्ज दाखल करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाबळेश्‍वर अर्बन बँकेचे अध्यक्ष राजेश कुुंभारदरे यांनी केले आहे

कुंभारदरे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे मार्चपासून येथील सर्वांचे उद्योगधंदे बंद आहेत. आवक बंद झाल्यामुळे अनेकांसमोर चरितार्थाचा प्रश्‍न उभा राहिला. रोजगार नसल्याने अनेकांची उपासमार सुरू झाली. ही बाब लक्षात घेवून महाबळेश्‍वर अर्बन बँकेने खास घरखर्चासाठी सभासदांना कर्ज देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेतून 4 महिने दरमहा साडे बारा हजार रुपये सभासदांना मिळणार आहेत. ऑक्टोबरमध्ये व्यवसायासाठी 50 हजार ते 1 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. पहिल्या योजनेसाठी अनेक सभासदांनी अर्ज दाखल केले असून  त्यांना यापूर्वीच पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. आता याच आठवड्यात दुसरा हप्ता खात्यावर जमा केला जाणार आहे. या कर्जामुळे सभासदांची चूल बंद राहाणार नाही. भविष्यात त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक अडचण येणार नाही याची काळजी बँकेने घेतली आहे. देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशाप्रकारचे गुन्ह घडू नयेत याची बँकेच्यावतीने काळजी घेतली जात आहे., परंतु जर घडलाच तर गुन्हेगार सापडला पाहिजे यासाठी बँक आपली सायबर सिक्युरिटी अद्ययावत करत आहे. राष्ट्रीयकृत बँकेतून ज्या सुविधा नागरिकांना मिळतात त्या सर्व सुविधा अर्बन बँकेच्या सभासदांना मिळाव्यात यासाठी बँकेने प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना यश आले असून लवकरच बँक आपल्या सभासदांना जनधन योजना सुरू करणार असून शासनाचे अनुदान थेट खात्यावर जमा होण्याकरिता बँक प्रयत्नशील  आहे. शासनाच्या योजनांना बँक थेट जोडली जाणार आहे. ही महाबळेश्‍वर अर्बन बँकेच्या सभासदांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सी. डी. बावळेकर, मुख्य व्यवस्थापक बाळकृष्ण साळुंखे, शाखाधिकारी फकीर वलगे, बँकेचे माजी अध्यक्ष दत्ता वाडकर, बाळकृष्ण कोंढाळकर, वृषाली डोईफोडे व संचालक उपस्थित होते.
Previous Post Next Post