फलटण, पालखी आणि पाऊस
स्थैर्य, फलटण (प्रसन्न रूद्रभटे), दि. ०१ : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दरवर्षी जून महिन्यात साधारणपणे फलटण मधून मार्गस्थ होतो. आषाढ महिन्यातील तृतीयेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम हा फलटण येथे असतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण येथे मुक्कामी असल्यावर फलटण करांसाठी एक वेगळीच पर्वणी असते फलटणकर पालखी सोहळा म्हणजे सणाप्रमाणे साजरा करतात. लाखो वारकरी आळंदीहून पंढरपूरला चालत जात असतात. त्यामधूनच फलटणकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असतात बहुतांशी सामाजिक संस्था, वैयक्तिक, उद्योजक हे विविध मार्गाने पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आपापल्या परीने सहाय्य करीत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पालखीमध्ये काही ना काही रूपाने वारकऱ्यांसाठी ही सेवाच करत असतात. दरवर्षी फलटण शहरामध्ये पालखी प्रवेश करताना ती हलकासा पाऊस घेऊन येते. यावर्षी करोना या महाभयंकर आजारामुळे पालखी सोहळा बस मधून निघाला व तो काल पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचला. परंतु बस मधूनही पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना फलटण शहरासह तालुक्यात मध्ये प्रवेश केल्यावर वरुणराजाने मात्र आपली परंपरा चुकवली नाही व नेहमीप्रमाणेच वरुणराजाने पालखीच्या फलटण येथे आगमनाला पावसाने शहरासह तालुक्यामध्ये स्वागत केले. त्यामुळे करोनो मुळे बऱ्याच परंपरा बदलल्या असल्या तरी पालखी सोहळा मधील ही पावसाची परंपरा काही बदलली गेली नाही.

सातशे ते आठशे वर्षांपासून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा आळंदी येथून पंढरपूर ते जातो. आळंदी येथून पंढरपूर कडे जात असताना फलटण येथे पालखी सोहळ्याचा एक मुक्काम किंवा दोन मुक्काम असतात. साधारणपणे तिथीचा क्षय झाला तरच फलटण येथे दोन मुक्काम होतात. तिथीचा क्षय हा सर्वसाधारणपणे चार ते पाच वर्षातून एकदा होतो. त्यामुळे चार ते पाच वर्षातून एकदाच फलटण येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दोन मुक्काम असतात. त्या वेळीही फलटण शहरांमध्ये व तालुक्या मध्ये प्रवेश करताना वरूणराजा पावसाने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत फलटणमध्ये करतो. त्यामुळे पालखी फलटण आणि पाऊस हे वेगळेच समीकरण आहे. पालखी फलटण मधून पुढे पंढरपूरकडे रवाना झाल्यानंतरही पावसाच्या हलक्या सरी फलटणमध्ये पडत असतात. त्याची फलटणकरांना नेहमीच आठवण येते किंवा त्याची सवय फलटणकरांना आहे. करोना या महाभयंकर आजाराने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असताना आपल्याला पालखी सोहळ्याचे स्वरूप यावेळी बदलावे लागले व आपल्या सर्वांच्या आवडत्या लाल परीने या वेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूर कडे रवाना झाला. परंतु वरुणराजाने आपली परंपरा न चुकवता यावर्षी फलटण मधून पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना पावसाचे हलक्याश्या सरी फलटण शहरासह तालुक्यामध्ये बरसल्या त्यामुळे करोना या महाभयंकर आजारामुळे नेहमीच्या परंपरेमध्ये बदल झाला तरी वरूण राजाने आपली परंपरा काही बदलली नाही फलटण शहरासह तालुक्यातुन मार्गस्थ होत असताना ठिकठिकाणी वरूणराजाने आपली हजेरी ही लावलीच.
Previous Post Next Post