मानकुमरे यांना धमकी देणाराऱ्यांचा पोलिसांनी छडा लावावा: आ. शिवेंद्रसिंहराजे
स्थैर्य, सातारा, दि. १२ : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे हे जावली तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. तालुक्याच्या विकासासाठी त्यांच योगदान मोठं आहे. अशा प्रतिष्ठीत व्यक्तीला आणि त्यांच्या मुलाला धमक्यांचे फोन येणं ही चिंताजनक बाब आहे. या सर्वाच्या पाठीमागे कोण आहे याचा छडा पोलीस प्रशासनाने लावावा. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन पोलीसांनी तातडीने संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

जावली तालुक्यात सध्या एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून त्यामध्ये मानकुमरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. मोरघर खिंड येथील दगड खाण याचाही उल्लेख त्यामध्ये आहे. सदर धमकी प्रकरणाची जावली तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने याची चौकशी करण्याची मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. वसंतराव मानकुमरे हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांनी जावली तालुक्याच्या विकासासाठी चांगल काम केले आहे. अशा लोकांना उघड धमकी देण्याचे प्रकार घडत असतील तर, तालुक्यात कायदा व सुव्यवस्था आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकारामागे कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा. या प्रकरणाचा त्वरीत छडा लावून पोलिसांनी संबंधीतांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करतानाच मी आणि संपुर्ण जावली तालुका मानकुमरे आणि त्यांच्या कुटूंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
Previous Post Next Post