दूध बंद आंदोलनास पाटण तालुक्यात प्रतिसाद
स्थैर्य, पाटण, दि. 22 : शेतकर्‍यांच्या दुधाला योग्य तो भाव मिळावा यासाठी संस्थापक-अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाराष्ट्रभर एकदिवशीय दूध बंद आंदोलन पुकारले होते. पाटण तालुक्यातील दूध संस्था, दूध उत्पादक यांनी एकदिवसीय आंदोलनात सहभागी होवून आपला पाठिंबा दिला. पाटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ग्रामदैवतांना दुग्धाभिषेक घालून अनोखे आंदोलन छेडले. या दूध बंद आंदोलनास शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष विकास हादवे यांनी दिली.

दूध व्यवसाय अंत्यत अडचणीत आलेला आहे. 30 ते 32 रुपये असलेला दर 18 ते 20 रुपये इतका खाली आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्याबरोबरच यावर अवलंबून असलेल्या सर्वांनाच याचा फटका बसला आहे.  वरून शासन दूध पावडरची आयात करत आहे किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शासनाने दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रती लिटर किमान 5 रुपये अनुदान तातडीने जमा करावे या मागणीसाठी स्वाभिमानीने दूध आंदोलन पुकारले होते. सध्या राष्ट्रीय आपत्ती कोरोना महामारी संकट असल्याने आपण एक दिवस सकाळ व संध्याकाळचे दूध कोठेही न घालता गोरगरीब लोकांना व आपल्या आजूबाजूला गरजू लोकांना याचे वाटप करावे अथवा दुधाचा ग्रामदैवतांना दुग्धाभिषेक घालावा, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले होते.

त्यानुसार पाटण तालुक्यातून या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तालुक्यातील मारूल, आंब्रुळे, बहुले आदींसह काही ठिकाणच्या गावात ग्रामदैवतांना दुग्धाभिषेक घालून आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष विकास हादवे, दीपक जाधव, शंकर टोपले, दिनकर भाकरे, लक्ष्मण टोपले, दीपक टोपले, सुशांत टोपले, मारुती टोपले, श्रीपती टोपले, उत्तम टोपले, नामदेव टोपले आदी कार्यकर्त्यांसह दूध उत्पादक, शेतकरी उपस्थित होते. आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Previous Post Next Post