सातारा पोलिसांची कामगिरी चांगली
स्थैर्य, सातारा, दि. 30 : सातारा जिल्हय़ात करोना स्थिती गेल्या दोन आठवडय़ापासून गंभीर होवू लागलीय मात्र प्रशासन या स्थितीवर मात करण्यासाठी योग्य प्रकारे काळजी घेत आहे. आता यापुढे 100 टक्के लॉकडाऊन शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घेत या स्थितीशी सामना केला पाहिजे. राज्य शासनाकडून सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा नागरिकांना पुरवण्यात येत आहेत. याच दरम्यान, लॉकडाऊन तसेच कोरोना कालावधीत राज्य पोलीस दलासह सातारा पोलिसांनी चांगली कामगिरी झाली असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हय़ातील करोना स्थिती तसेच पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या कामाचा आढावा बैठकीनंतर गृहमंत्री देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून कोरोनावर मात करण्यासाठी चांगले प्रयत्न सुरु असून यामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी प्रशासन व नागरिकांमध्ये चांगला समन्वय ठेवत स्थिती हाताळली असल्याचे सांगितले. सध्या अनलॉकच्या दिशेने जाताना नागरिक घराबाहेर पडत असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज मंत्री देशमुख यांनी व्यक्त केली.

लॉकडाऊन आता शक्य नाही. अनलॉकच्या दिशेने जाताना पोलीस दलाला शासनाकडून सर्व प्रकाराचे सहकार्य करण्यात येत आहे. मुंबई पोलीस दलाचा करोनाविरुध्दचा लढा अखंड सुरुच असून करोना युध्दात सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची काळजी राज्य शासन घेत आहे. मुंबईत पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने उपचार मिळण्यासाठी खास त्यांच्यासाठी करोना केअर सेंटर उभाण्यात येणार असून त्यासाठी निधीही उपलब्ध झाला असल्याची माहिती मंत्री देशमुख यांनी यावेळी दिली.

यावेळी शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांसह गाडय़ांचे ताफे घेवून फिरत आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवाल केला असता मंत्री देशमुख म्हणाले, सध्या शासन व सर्वांपुढे कोरोनाचे आव्हान आहे. त्यामुळे फक्त कोरोनाविरुध्द लढायचे आहे. पडळकर आणि इतर विषय आपण नंतर बोलू.
Previous Post Next Post