जिल्हा रुग्णालयातून पळालेल्या कोरोनाबाधित व्यक्तीने खटावमध्ये नातेवाइकांकडे घेतला पाहुणचार
स्थैर्य, सातारा, दि. 20 : जिल्हा रुग्णालयातून पळालेला कोरोना बाधित व्यक्ती खटावमधील नातेवाइकांकडे मुक्कामी असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती रुग्णालयातील पोलीस चौकीमध्ये कार्यरत असणारे सहाय्यक फौजदार अजय गोसावी यांनी दिली. संबंधित व्यक्तीबाबत त्याच्या कुटुंबीयांना माहिती होती. मात्र त्यांनीच ही माहिती लपवली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीच्या चौकशीनंतर त्याला क्वारन्टाईन करायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी सांगितले.

शिरवळ, ता. खंडाळा येथील 70 वर्षीय व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने त्याच्यावर शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले असता त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती समजताच त्याच्या कुटुंबीयांना क्वारन्टाईन करून त्याला जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर वार्ड क्रमांक 2 मध्ये उपचार सुरू होते. दि. 6 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास संबंधित व्यक्ती रुग्णालयातून निघून गेला. रुग्णालय प्रशासनाने याबाबत रितसर पोलिसात तक्रार न करता रुग्णालयातील पोलीस चौकीत तोंडी माहिती देण्यात आली होती.त्यामुळे या घटनेबाबत कोणाला, काहीही समजले नाही. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी संबंधित कर्मचार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली होती.

शिरवळ येथे क्वारन्टाईन असलेल्या संबंधित व्यक्तीच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधत संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीची चौकशी केली असता प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

प्रशासनाने रुग्णालयातील पोलीस चौकीत कार्यरत असणारे सहाय्यक फौजदार अजय गोसावी, पोलीस कर्मचारी पवार, बनकर यांच्याकडे त्या पळून गेलेल्या व्यक्तीबाबत चौकशी केली असता त्यांनी रुग्णालय प्रशासनाने त्या व्यक्तीबाबत अत्यंत अपुरी माहिती  दिली आहे तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे रुग्णालयातून पळून गेलेल्या त्या व्यक्तीबाबत गूढ निर्माण झाले होते.

सहाय्यक फौजदार अजय गोसावी यांनी रविवारी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचा मोबाईल नंबर मिळवून फोन केला असता संबंधित व्यक्तीच्या सुनेने ती व्यक्ती खटाव येथील नातेवाइकांकडे असल्याची माहिती पोलिसांना दिली. संबंधित व्यक्ती सुखरूप असल्याने जिल्हा रुग्णालयातील पोलिसांसह रुग्णालय प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे. संबंधित व्यक्तीबाबत त्याच्या नातेवाइकांनी माहिती लपवली असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित व्यक्तीचे क्वारन्टाईनचे दिवस संपले आहेत. त्याच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतरच त्याला पुन्हा क्वारन्टाईन करायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
Previous Post Next Post