महाबळेश्वर येथील प्रसिद्ध लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला
स्थैर्य, महाबळेश्वर, दि. १० : महाबळेश्वर येथील प्रसिद्ध, पर्यटकांचा मुख्य आकर्षणाचा केंद्र बिंदू असलेला लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने यावेळी मात्र काहीसा उशिरा का होईना आपल्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर मध्ये गेल्या काही दिवसांपासून  मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पावसाची संततधार कायम असून ओढे, नाले भरून वाहत आहेत.आज एका दिवसात ११२ मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.निसर्गरम्य ठिकाण असलेल्या महाबळेश्वर मध्ये पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात  असते. हिरव्यागार निसर्गात, दाट धुक्यात आणि रिमझिम पावसात भिजण्याची मजा काही औरच असते.

नेहमीच पर्यटकांना खुणावत आलेला, पावसाळ्यात महाबळेश्वरला आल्यावर पर्यटकांची पहिली पसंती असते ती लिंगमळा धबधबा पाहण्याची. हा लिंगमळा धबधबा म्हणजे पर्यटकांना पर्वणीच असते. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या ठिकाणाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. महाबळेश्वर शहरा पासून साधारण चार कि.मी अंतरावर असलेला हा उंचावरून फेसाळणारा धबधबा वेण्णा नदीत तीन टप्प्यात कोसळतो. याची एकूण उंची साधारण ५५० ते ६०० फूट इतकी आहे.

पावसात मनसोक्तपणे भिजण्याबरोबर, वृक्षराजी मधून जंगल भ्रमंती देखील घडून येते, निसर्ग न्याहाळत फिरणे, फोटो घेत, गरम मका कणीस, वडा पाव, यावर पर्यटक ताव मारत असतात. अबालवृद्धां बरोबर तरुणांचे आवडीचे ठिकाण. पण यावेळी मात्र  पर्यटकांच्या या आनंदावर विरजण पडलंय आणि याला आड आलंय ते संकट कोरोनाचं. कारण या कोरोनाच्या या संकट काळात येथील पावसाळ्यात खुलणारा, फुलणारा निसर्ग आणि निसर्गाची विविध रूपे पाहता येणार नाहीत आणि त्याच बरोबर येथील स्थानिक नागरिकांचे व्यवसाय हे पूर्णपणे पर्यटकांवर अवलंबून असल्याने त्यांना याची झळ बसली आहे. त्यामुळे लिंगमळा धबधब्या बरोबर येथील प्रसिद्ध ठिकाणही पर्यटकांवीना ओस पडलेली पाहायला मिळत आहेत.


Previous Post Next Post