वाई तालुक्यातील पोलीस व प्रशासनाचे काम चांगले
स्थैर्य, पांचगणी, दि. 21 : जिल्हाबंदी असतानाही परजिल्ह्यातून जुगार खेळण्यासाठी धनिक येथे कसे आले याची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात येणार असून जिल्हाबंदीची अंमलबजावणी अजून कडक करण्यात आली आहे. जिल्ह्यात अजून कम्युनिटी स्प्रेड आउट नसून कोरोनाची साखळी तुटण्यासाठीचा पहिला उपाय लॉकडाउन हाच आहे. प्रशासन त्यासाठी कडक अंमलबजावणी करीत आहे. वाई तालुक्यातील पोलीस, महसूल विभाग व प्रशासनाचे काम चांगले चालले आहे, असे उद्गार गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत काढले.

ना. शंभूराज देसाई यांनी आज वाई तालुक्यास भेट देवून पोलीस चौक्यांची स्वतः पाहणी केली. यावेळी प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेवून त्यात तालुक्यातील कोरोना परिस्थिती व त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.

यावेळी आ. मकरंद पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धैर्यशील पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, मुख्याधिकारी सौ. विद्यादेवी पोळ, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, संजय मोतेकर, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक नारायण गोसावी तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

ना. देसाई  म्हणाले, कोरानाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाल्यापासून प्रशासकीय यंत्रणा प्रयत्नपूर्वक काटेकोरपणे उपाययोजना करत आहे. पोलीस प्रशासन चोवीस तास काम करत असून त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यासाठी जिल्ह्यात नवीन तीनशे होमगार्ड नेमण्याची मान्यता देण्यात आली आहे. पोलिसांचा संपर्क जनतेशी सर्वाधिक येत असल्याने ते बाधित होत आहेत. परंतु त्यांचे मनोधैर्य खचणार नाही याचा मला विश्‍वास आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर पुरविण्यात आले आहे. 55 वर्षावरील एकाही पोलीस कर्मचार्‍यास फिल्डवर काम दिलेले नाही. यातूनही जे पोलीस व त्यांचे कुटुंबीय कोरोनाने बाधित झाले आहेत त्यांची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. नजीक असलेल्या व जेथे बेड उपलब्ध आहे त्या ठिकाणी पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने दाखल करण्यात येवून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहेत.  राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मनुष्ययबळ अल्प असल्याने त्यांना कारवाई करण्यात अनेक अडचणी येत आहेत. परंतु तरीही राज्य उत्पादन शुल्कच्यावतीने अनेक ठिकाणी छापे टाकून अवैध दारूचे साठे जप्त करण्यात येत आहेत. त्यांचे काम चांगले चालले आहे, असे सांगून ना. देसाई  म्हणाले, पालिकेने कोरोनासाठी राखीव ठेवलेला फंड नेमका कोणत्या कामांसाठी वापरायचा आहे याबाबत नगरविकास मंत्रालयाने स्पष्ट सूचना केलेल्या नाहीत. याबाबत संबंधितांशी बोलून तो प्रश्‍न  लवकरच मार्गी लागेल. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनिल शेंडे, उपतालुका प्रमुख विवेक भोसले शहरप्रमुख किरण खामकर, गणेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya