बेकायदा वाळू वाहतूक प्रकरणी तीन ट्रॅक्टर जप्त
स्थैर्य, सातारा, दि. 30 : तालुक्यातील कामेरी आणि तासगाव येथे बेकायदा वाळू प्रकरणी सातारा प्रांताधिकारी मीनाज मुल्ला व त्यांच्या पथकाने तीन ट्रॅक्टर आणि एक टिपर जप्त केला. संबंधितांना सुमारे 5 लाख 44 हजारांचा दंड होणार असल्याची माहिती सातारा तहसील कार्यालयातून देण्यात आली.

सातारा प्रांताधिकारी मीनाज मुल्ला तालुक्यातील कोरोनाबाधित प्रभावित क्षेत्राची (कंटेन्मेंट झोन) पाहणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांना कामेरी येथे बेकायदा वाळू वाहतूक सुरू असल्याचे आढळले. घटनास्थळावरून ट्रॅक्टर   (क्र. एमएच 11 एम  एक्सएक्स 7903) ताब्यात घेण्यात आला. ट्रॅक्टर मालक दत्तात्रय बाळासाहेब कोळी तसेच टिपर (क्र. एमएच 11 सीएच2944) मालक मोहन आत्माराम घाडे (दोघेही रा. कामेरी) यांना प्रत्येकी 1 लाख 36 हजाराचा दंड करण्यात आला आहे. ट्रॅक्टर व टिपरमध्ये प्रत्येकी 1 ब्रास वाळू आढळून आली.

तासगाव येथेही बेकादा वाळू वाहतूक प्रकरणी दोन ट्रॅक्टरवर कृष्णा नदीपात्रात मळवी शिवारात कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणी तुकाराम किसन ताटे (रा. अंगापूर) यांचा ट्रॅक्टर (क्र. एमएच11 जी 2490) तसेच बापूराव मानसिंग कणसे यांचा ट्रॅक्टर (क्र. एमएच 11 यू 3588) बेकायदा वाळू वाहतूक करताना आढळून आला. दोन ट्रॅक्टरमधून प्रत्येकी 1 ब्रॉस वाळू वाहतूक सुरू असल्याचे समोर आले. दोघांनाही प्रत्येकी 1 लाख 36 हजाराचा दंड करण्यात आला. बेकायदा वाळू प्रकरणी संबंधितांचे पंचनामे करण्यात आले असून त्यांना सुमारे 5 लाख 44 हजारांचा दंड होणार आहे. संंबंधितांना नोटीस देण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या कारवाईत नायब तहसीलदार विजयकुमार धायगुडे, लिपिक अभय पवार यांनी सहभाग घेतला.
Previous Post Next Post