तोतया पोलिसाला अटक
स्थैर्य, सातारा, दि. १९ : सातारा येथील करंजे नाका परिसरामध्ये वाहतूक पोलिसांचा रेनकोट घालून वाहनधारकांना अडवणाऱ्या तोतया पोलिसाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संतोष तुकाराम मोरे (रा करंजे, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे.

याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सातारा शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नेमका याच संधीचा गैरफायदा घेत, संशयित मोरे हा करंजे नाका परिसरामध्ये मुंबई पोलिस दलामध्ये वाहतूक पोलिसांना दिला जात असलेला रेनकोट घालून दुचाकी व चारचाकी वाहनांना अडवत होता.

याबाबत शहरातील एका सजग नागरिकाने शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना माहिती दिली. त्यानंतर वायकर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना करंजे नाका येथे पाठवून संशयिताला ताब्यात घेतला व त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous Post Next Post