वृक्ष हे मानवाचे मित्र आहेत
स्थैर्य, सातारा, दि. २९ : वृक्ष हे मानवाचे मित्र आहेत. सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण आहे. हे वातावरण वृक्षारोपणासाठी अत्यंत  पोषक  असते. याचा फायदा सर्वांनी उठवावा, असे उद्गार रोटरी क्लब अध्यक्ष मनीष मुक्कावर यांनी काढले.

महाबळेश्‍वर रोटरी क्लब व ग्रामपंचायत अवकाळी यांच्या संयुक्त विद्यमाने महाबळेश्‍वर तालुक्यातील अवकाळी गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच झाला. त्यावेळी मुक्कावर बोलत होते.वृक्षारोपणाचा शुभारंभ गावाच्या प्रवेशद्वाराजवळ दुतर्फा वृक्ष लावून झाला. यावेळी सचिव प्रा. गणेश कोरे, रो. शिरीष गांधी, अवकाळीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व वृक्षप्रेमी विजयराव भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.

वृक्ष हा मानवाचा परम मित्र असून त्यापासून सर्वांनाच सावली, फळे, लाकूड, औषध याच बरोबर पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी मौलिक मदत होत असते. त्यामुळे नुसतेच वृक्षारोपण न करता त्याची योग्य प्रकारे जोपासना व संवर्धन करणे गरजेचे आहे. अवकाळी गावाचा याबाबतीतचा  लौकिक चांगला आहे. ते या वृक्षांचे संवर्धन चांगल्या प्रकारे निश्‍चितच करतील, असे उद्गार मुक्कावर यांनी काढले. यावेळी आवकाळी गावचे आजी-माजी सरपंच, ग्रामस्थ, तरुण तसेच रो. ब्रिजभूषण सिंग, अविनाश गोंदकर, राजेश मार्तंड, विजय काळे आदी मान्यवर उपस्थित होते. विजयराव भिलारे यांनी  स्वागत केले.  प्रा. गणेश कोरे यांनी आभार मानले. 
Previous Post Next Post