रेल्वेप्रश्‍नी उदयनराजेंची डिव्हिजनल रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा
स्थैर्य, सातारा, दि. 8 : रेल्वे लाईनचे दुहेरीकरण करण्यासाठी संपादित करण्यात येणार्‍या जमिनी आणि त्या जमीन मालकांच्या समस्या जाणून घेवून संपादनाची कार्यवाही पूर्ण करावी.  संपादनासाठी मंजूर करण्यात आलेल्या 33 कोटी रुपयांपैकी फक्त 1 कोटींचे वाटप संबंधितांना केले आहे. राहिलेले वाटप तातडीने करावे. सातारा-पुणे अशी दररोज सकाळ-संध्याकाळ रेल्वे शटल सेवा सुरू करावी. जिल्ह्यातील रेल्वे गेट क्रॉसिंगच्या ब्रिटिशांपासून असलेली फाटक पद्धत बंद करून तेथे सुरक्षित पुलांची उभारणी करावी  या प्रमुख मागण्यांसह, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी रेल्वे संबंधीचे अनेक प्रश्‍न व त्यावरच्या उपाययोजना नमूद करून जिल्हा पातळीवर पुणे डिव्हिजनचे अधिकारी व प्रतिनिधी  यांनी 15 दिवसातून एकदा बैठक बोलावून

रेल्वेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी गतिमान प्रशासन पद्धत अवलंबावी, अशा सूचना केल्या.
बुधवारी रेल्वेच्या पुणे डिव्हिजनच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा, रेल्वेचे कमर्शियल इंजिनिअरिंग व इतर विभागातील अधिकारी, सातारा जिल्ह्यातील भूसंपादन विभागातील महसूल अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत खा.  उदयनराजे भोसले बोलत होते.

सातारा जिल्ह्यातून महत्त्वाची शहरे आणि गावांमधून रेल्वे सेवा गेली आहे. नुकतेच एकेरी मार्गाचे दुहेरी मार्ग करण्याचे काम प्रगतिपथावर असून डिझेल इंजिन ऐवजी इलेक्ट्रिक इंजिनवर धावणारी इलेक्ट्रिक ड्राईव्ह सिस्टीमचेही काम गतीने सुरू आहे. या कामात भूसंपादनाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. पूर्वीपासूनची महत्त्वाची असलेली रेल्वे रेकॉर्डस आढळून येत नाहीत. मिसप्लेस झाली आहेत का गहाळ झाली आहेत याची माहिती घेवून, नवीन अद्यावत यंत्रणेव्दारे रेल्वे रेकॉर्ड तयार करावे. कराड-चिपळूण नवीन  रेल्वे मार्गासाठी सन 2020-21 च्या रेल्वे बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. याकरिता सन 21-22 मध्येही जरूर ती तरतूद करून कामाचा पाठपुरावा वेळच्या वेळी झाला पाहिजे, अशी सूचना खा. उदयनराजे यांनी केली.

सातारा जिल्ह्यात रेल्वे पोलीस दलात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय रेल्वेने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आपत्कालीन परिस्थितीत रेल्वेव्दारे सेवा उपलब्ध करून दिली जाते. हे रेल्वेचे महत्त्व अधोरेखित करणारी बाब आहे. सध्या कोविड-19 च्या काळात रेल्वे प्रवास सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार ठेवावा. जेणेकरून ऐनवेळी नियोजनामध्ये वेळ जायला नको. कोणत्याही परिस्थितीत  रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली गेली पाहिजे. जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांमध्ये आवश्यक त्या विविध व सुधारणा हाती घ्याव्यात आदी सूचना त्यांनी केल्या.

यावेळी रेणू शर्मा यांनी खा. उदयनराजे यांचे स्वागत केले. खा. उदयनराजे यांच्या  सूचनांनुसार तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल. 15 दिवसातून एकदा जिल्हास्तरावर चर्चा व्हावी म्हणून उपाययोजना राबविल्या जातील. सातारा ते पुणे शटल सेवा सुरू करण्याबाबत पुणे डिव्हिजन सकारात्मक आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी सुनील काटकर, भरतराव माने, रॉबर्ट मोझेस, अ‍ॅड. डी. जी. बनकर, संग्राम बर्गे, जितेंद्र खानविलकर, काका धुमाळ, शफीक इनामदार, अजय मोहिते, मनोज सोळंकी आदींसह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post