आगळ्या पुस्तकाचे आगळेवेगळे प्रकाशन
 स्थैर्य, सातारा, दि. १० : ज्येष्ठ करसल्लागार, चित्रपट निर्माते व साहित्यिक अरुण गोडबोले यांनी आपल्या ५७ वर्षांच्या इन्कम टॅक्स प्रॅक्टिस मधील अनुभवांचे लेखन करून " इन्कमट्याक्सच्या नवलनगरीत " हे पुस्तक सिद्ध केलेले आहे. अनेक मजेदार तर कधी तापदायक, काही आनंदाचे तर काही हसविणारे अशा अनुभवांचे आणि तेही इन्कम टॅक्ससारख्या रुक्ष व किचकट विषयावरील हे बहुधा पहिलेच पुस्तक असावे.

कोरोना  काळातील अनेक बंधने असल्याने नेहमीची समारंभाची प्रथा सोडून ते आज अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांच्या घरातील कार्यालयातच आणि तेही त्यांचा नातू आर्यन याचे हस्ते आणि त्यांची यशस्वी परंपरा समर्थपणे पुढे चालविणारे कर सल्लागार सुपुत्र उदयन गोडबोले यांच्या उपस्थितीत प्रकशित करण्यात आले.

ज्या ऑफिसमध्ये  माझे वडील कै रा. ना. गोडबोले यांनी १९६३ पर्यंत, नंतर मी १९६३ ते १९९७ पर्यंत व त्यानंतर आता उदयन काम करत आहे तेथेच आणि तेसुद्धा आमच्या पुढच्या पिढीच्या हस्ते प्रकाशित व्हावे हा शुभ योग आहे. इन्कम टॅक्स खात्याचा करदात्यांना उगाचच बाऊ वाटतो. तेथेही आपल्या सारखीच बहुसंख्य सरळमार्गी माणसे असतात याचा या पुस्तकातून प्रत्यय येईल. देशासाठी प्रामाणिक पणे आयकर देणे हे आपले कर्तव्य आहे ही भावनाही वाचकांच्या मनात यातील रंजक अनुभव वाचताना जागृत होईल अशी अपेक्षा लेखक अरुण गोडबोले यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

आर्यन ने ते पुस्तक वाचल्यावर  मला आजोबांनी किती परिश्रम घेऊन यश मिळवले व माणसेही जोडली हे समजले असे सांगितले.

२२४ पानांचे व रु. २७० मुल्य असलेले  हे पुस्तक सोमवारपासून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख ग्रंथ विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल, तसेच कौशिक प्रकाशन ६९ शनिवार पेठ सातारा  ४१५००२ ( फोन क्र ९८२२० १६२९९ ) येथेही संपर्क साधता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
Previous Post Next Post