चित्रपटाच्या प्रक्रियेवर भाष्य करणारे पुस्तक ‘ते १४ दिवस सुखद स्वप्नपूर्तीचे’
स्थैर्य, सातारा, दि. २४ : "लाईट,कॅमेरा आणि अ‍ॅक्शन" असे शब्द कानावर पडले कि,आपल्या डोळ्यासमोर सिनेमाचा मोठा कॅमेरा किंवा शूटिंगची छायाचित्रे येतात. सिनेमाचे आकर्षण लहानांपासून- मोठ्यांपर्यंत सर्वांना असते. पण प्रत्यक्षात 'एखादी गोष्ट कशी सुचत असेल? सिनेमाचे चित्रीकरण कसे होत असेल?  कॅमेरा कुठला वापरत असतील? कलाकार न थकता कसे अभिनय करत असतील? मेकअप कसा होत असेल?  त्या मेकअपला साधारण किती वेळ लागेल? स्टेज कसा बनवत असतील? कलाकारांच्या कपड्यांची निवड कशी होत असेल?' अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला पडत असतात.पण आता आपल्याला एका  नव्याकोऱ्या पुस्तकात या सर्व प्रश्नांची उत्तरे वाचायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या शूटिंगचा संपूर्ण प्रवास आता पुस्तकरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. या पुस्तकाचे लेखन येथील हरहुन्नरी कलावंत आशिष निनगुरकर यांनी केले आहे. प्रतिभा प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकाचे नाव 'ते १४ दिवस' (सुखद स्वप्नपूर्तीचे) असे आहे. या पुस्तकात सिनेमाच्या  'प्री-प्रॉडक्शन पासून शूटिंग' पर्यंतचा संपूर्ण आणि चित्रपट प्रदर्शित होण्यापर्यंतचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. हे पुस्तक वाचतांना आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण सिनेमा उभा राहतो. नुकतेच आशिषने सोशल मीडियावर त्याच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण केले आहे.

 "सिनेमाच्या रसिकमायबाप प्रेक्षकांना लोकार्पण……" अशा अर्पणपत्रिकेने सुरुवात असलेल्या या पुस्तकात सिनेमाचे तंत्र-मंत्र आणि शुटिंगचे वास्तव अनुभव व काही मजेदार किस्से पण सांगितले आहेत.'किती कॅमेरे वापरायचे, कुठले अँगल लावायचे, कॅमेरा कुठून कसा येणार, कसा जाणार, प्रकाशयोजना कशी करायची, दिग्दर्शक 'लाइट्स, साउंड, कॅमेरा,अ‍ॅक्शन' असं ओरडतो ते 'कट' असं बोलेपर्यंत असा एका संपूर्ण सिनेमाचा जिवंत प्रवास या पुस्तकात वाचायला मिळेल. या पुस्तकाला सिनेसमीक्षक व लेखक अशोक उजळंबकर यांची प्रस्तावना लाभली आहे. 'नवे काहीतरी करण्याची उर्मी' व 'त्यासाठी संघर्षाची मानसिकता असेल तर कलाक्षेत्र आपणास स्वीकारते',असे हक्काने सांगणारा आशिष या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना या पुस्तकातून चंदेरी दुनियेचा 'सिनेमामार्ग कसा आहे?',असा संदेश देऊ पाहतो. नव्या उभरत्या सिताऱ्यांना व सिनेमाप्रेमींना हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल असे वाटते. आशिषच्या 'संघर्ष'मयी अशा नव्याकोऱ्या पुस्तकाला रसिकवाचक नक्कीच उदंड प्रतिसाद देतील याच आभाळभर शुभेच्छा. आशिषने आतापर्यंत काही चित्रपट व मालिकांमध्ये अभिनयाची चुणूक दाखविली असून त्याबरोबरच पटकथालेखन, चरित्रलेखन व गीतलेखन अशा क्षेत्रात तो मुशाफिरी करत आहे.अनेक वृत्तपत्रे,विविधमासिके व दिवाळी अंकांमधून त्याच्या लेखनाचे पैलू  दाखविले असून मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंतांचा प्रवास 'स्ट्रगलर' या पुस्तकातून मांडला.आशिषचे 'हरवलेल्या नात्यांचं गाव' व 'न भेटलेली तू' हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. 'रायरंद' व 'एक होतं पाणी' या चित्रपटाचे संपूर्ण लेखन आशिषचे असून या सिनेमाचा वास्तव प्रवास  त्याने जवळून अनुभवला आहे.अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये या दोन्ही सिनेमाची नोंद घेण्यात आली व अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सिनेमाच्या नेमक्या त्या १४ दिवसांत 'घडलेल्या अनेक गोष्टी' व 'उभा राहिलेला सिनेमा' हा प्रवास या पुस्तकात वाचायला  मिळेल.

Previous Post Next Post