पुसेगावच्या शासकीय विद्यानिकेतनचा दोन कोटींचा अल्पकालीन आराखडा तयार
स्थैर्य, सातारा, दि. 23 : अपुरे शिक्षक, घटत चाललेली विद्यार्थी संख्या, पूर्णवेळ नसलेले प्राचार्य त्यामुळे दुरवस्था झालेल्या पुसेगावच्या विद्यानिकेतनला गतवैभव मिळवून देण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या निर्देशानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, डाएटचे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, विद्यानिकेतनचे प्रभारी प्राचार्य बी. एम. वसेकर यांच्या उपस्थितीत या विद्यानिकेतनसाठी दोन कोटी रुपयांचा अल्पकालीन आराखडा तयार करण्यात आला असून जिल्हयातील नामवंत संस्थेतील शिक्षक प्रतिनियुक्तीवर या शाळेत पूर्णवेळ घेण्यात येणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, राज्यात धुळे, अमरावती, औरंगाबाद, पुसेगाव (सातारा), केळापूर (यवतमाळ) अशा पाच ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी मागील मार्चमध्ये पुण्यात सर्व संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्यास अनुसरून कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी पुसेगाव विद्यानिकेतनबाबत त्रैमासिक बैठका घेण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार मागील आठवड्यात पुसेगाव येथे बैठक घेण्यात आली. पुसेगाव पब्लिक स्कूल म्हणून जिल्ह्यात ओळखल्या जाणार्‍या शाळेचा आजही नावलौकिक आहे. येथे प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास व भोजनासह अन्य सुविधा दिल्या जातात. आजही या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो.राज्यस्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धा परिक्षेतून येथील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित होतात. मात्र अपुर्‍या शिक्षकांमुळे विद्यार्थी प्रवेश घेण्यास उत्सुक नसतात. शासकीय विद्यानिकेतन (निवासी) हे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिनस्त असून त्याची स्थापना 1966 साली कोयनानगर, ता. पाटण, जि. सातारा येथे झाली; परंतु सन 1967 च्या प्रलंयकारी भूकंपानंतर कोयनानगर विद्यानिकेतनचे स्थलांतर सातारा येथे करण्यात आले व तद्नंतर सन 1979 पासून पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा येथे सुमारे 120 एकर जमिनीत विस्तीर्ण परिसरात ते सुरू आहे. या विद्यानिकेतनची एकूण 240 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. शिष्यवृत्ती परिक्षेतून उत्तीर्ण होणार्‍या गुणवत्तेनुसार पात्र विद्यार्थ्यांना आदिवासी, अनुजाती-जमाती, खुला, एनटी इ. प्रवर्गातील आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो. विद्यानिकेतनच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय विद्यानिकेतन, पुसेगाव येथे दि. 14 जुलै रोजी सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. प्रथमतः विद्यानिकेतनची सद्यस्थिती, आवश्यक सुधारणा, विद्यानिकेतन प्रशासनात येणार्‍या अडीअडचणी यावेळी निदर्शनास आणून दिल्या गेल्या. तद्नंतर विद्यानिकेतनचा दीर्घकालीन व अल्पकालीन आराखडा तयार करण्याबाबत चर्चा झाली.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya