म्हसवड शहरासाठी ५ नवे व्हँन्टेलेटर मशीन देणार - ना. विश्वजीत कदम

 


स्थैर्य, म्हसवड दि. २५ : म्हसवड शहरात कोरोनाने शतकपुर्ती केली असुन याठिकाणी आणखी रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडणार असल्याची भिती सर्वसामान्य म्हसवडकर जनतेतुन व्यक्त होत असतानाच राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी याची गंभीर दखल घेत येथील रुग्णांची हेळसांड होवु नये त्यांना म्हसवड येथेच चांगल्या रुग्ण सुविधा मिळाव्यात याकरीता एकट्या म्हसवड शहराकरीता ५ नव्या व्हँटिलेटर मशीन देण्याचे आश्वासन देत तात्काळ याची अंमलबजावणी करण्यासाठी चक्रे फिरवल्याने म्हसवडकर जनतेतुन समाधान व्यक्त होत आहे.


माण तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सर्वत्र वाढत असतानाच एकट्या म्हसवड शहराने शंभरी ओलांडल्याने तालुक्यातील प्रशासन हडबडले आहे. अशातच दररोज वाढत जाणारे रुग्ण ठेवायचे कोठे असा प्रश्न आरोग्य व प्रशासनासमोर उभा ठाकला असतानाच दि. २५ रोजी राज्याचे राज्य मंत्री विश्वजीत कदम यांनी अचानक म्हसवड शहराला भेट दिली यावेळी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री. सिध्दनाथाचे बाहेरहुन दर्शन घेवुन मंत्री महोदय परतत असताना त्यांना शहरातील काही नागरीकांनी मंदिर परिसरातच गाठले यावेळी शहरातील आम्ही म्हसवडकर टिमचे कार्यकर्ते कैलास भोरे यांनी मंत्री कदम यांना शहरातील कोरोना स्थितीचा अहवाल मांडताना शहरात अद्यावत असे सुसज्ज रुग्णालय हवे असल्याचे सांगत कोरोना काळात शहरातील आम्ही म्हसवडकर टिम राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तर शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरातील एका सध्या बंद असलेल्या सुसज्ज रुग्णालयात जर व्हँटीलेटरची सोय उपलब्ध झाल्यास येथील रुग्णांची सोय होणार असल्याचे सांगुन याबाबत ना. कदम यांनी मदत करण्याची विनंती केली. आजवर नेहमीच म्हसवडकरांच्या गरजेला धावुन येणारे ना. कदम यांचे कुटुंबिय अाले आहे, त्याप्रमाणे आजही म्हसवडकरांची गरज ओळखुन ना. कदम यांनी तात्काळ जिल्हाधिकारी सातारा यांना फोन लावुन म्हसवड शहरासाठी मी आमच्या ट्रस्टच्या माध्यमातुन ५ नवीन व्हँटीलेटर देत असुन त्याबाबतचे तसे मागणीपत्र देण्याची सुचना केली. त्यामुळे म्हसवड शहराला भेडसावणारी व्हँटीलेटरची चिंता चुटकीसारखी सुटली असल्याचे मत आम्ही म्हसवडकर च्या टिम कडुन व्यक्त होत आहे. तर ना. कदम यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पुढील अठवड्यापासुन शहरात ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत माजी नगरसेवक कैलास भोरे यांनी व्यक्त केले. यावेळी स.पो.नि. गणेश वाघमोडे उपस्थित होते.


दरम्यान म्हसवड शहर हे सध्या डेंजर झोनमध्ये असताना या शहराला लागणार्या गरजा काय आहेत त्याठिकाणी काय उपाययोजना राबवाव्यात यासाठी माणमधील सर्वच राजकीय पक्षाचे बडे नेते मात्र मौनीबाबा बनले असल्याचे चित्र आहे. मात्र शहरावर आलेले हे संकट दुर करण्यासाठी शहरातील सर्व युवा वर्ग आपले राजकीय गट - तट बाजुला ठेवत एकत्र आले असुन ते गत ६ महिन्यांपासुन आम्ही म्हसवडकर या नावाने आपले सामाजीक काम करीत प्रशासनालाही मदत करताना दिसत आहेत.


स्व. पतंगराव कदम ट्रस्टच्या माध्यमातुन मदत करणार - ना. विश्वजीत कदम 

म्हसवड शहरासाठी देण्यात येणाऱ्या व्हँटीलेटर मशीनची उपलब्धता कशी करणार याबाबतची विचारणा पत्रकारांनी ना. कदम यांचेकडे केली असता स्व. पतंगराव कदम यांचे नावाने आम्ही आपत्ती व्यवस्थापन नावाचे एक ट्रस्ट चालवत असुन त्या माध्यनातुनच आम्ही आजवर सांगली येथील महापुराच्या वेळी जनसेवा म्हणुन प्रशासनाला बोटी उपलब्ध करुन दिल्या होत्या त्याप्रमाणेच म्हसवड शहरासाठी आम्ही ५ व्हँटीलेटर मशीन उपलब्ध करुन देणार असल्याचे ना. कदम यांनी स्पष्ट केले.