सातारा नगर पालिकेत पुन्हा अभिजित बापट मुख्याधिकारी

  स्थैर्य, सातारा, दि. १२ :  सोलापूर महापालिकेचे उपायुक्त अभिजीत बापट यांची सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी पदी वर्णी लागली आहे. मुख्याधिकारी शंकर गोरे बदलून गेल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या रंजना गगे यांची महिनाभरात बदली झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.


कोेरोना संसर्ग वाढू लागलेला असतानाच उपमुख्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले तर काही दिवसांतच मुख्याधिकारी शंकर गोरे यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी आलेल्या रंजना गगे यांनी सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा भार चांगल्या पद्धतीने सांभाळला होता. लक्ष्मी टेकडी परिसरात कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी केलेल्या अँटी जेन टेस्ट कामामुळे तेथील करोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले. कामचुकार अधिकार्‍यांना शिस्तीचा चाप लावण्यात त्यांनी कसूर केली नाही. प्रशासकीय कारभाराचे गाडे सुरळीत करत असताना रंजना गगे यांच्या जागी सोलापूर महापालिकेचे उपायुक्त म्हणून अभिजीत बापट यांची प्रशासकीय बदली झाल्याचे नगरविकास विभागाकडून लेखी पत्र मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाले. 2012 ते 16 या चार वर्षात बापट यांनी आधी सातार्‍यात नगर प्रशासन अधिकारी म्हणून आणि त्यानंतर तीन वर्ष म्हणून सातारा पालिका मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावली होती. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्याशी उत्तम समन्वय असणारे मुख्याधिकारी म्हणून अभिजीत बापट यांची ओळख आहे. 


मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या प्रशासकीय सेवेचे बावीस महिने शिल्लक होते त्यांनी सुद्धा पुणे विभागात बदली मिळावी यासाठी विनंती अर्ज नगर विकास विभागाकडे केला होता. त्यापुर्वीच राजकीय संपर्कातील मुख्याधिकारी सातार्‍यात आणण्यासाठी सत्ताधारी सातारा विकास आघाडीकडून मोठी मोर्चेबांधणी मंत्रालयात झाली होती. त्याकारिता सातार्‍यातील काही राजकीय कार्यकर्त्यांची मनधरणी करून ही राजकीय गोळाबेरीज करण्यात कोठेही कसर ठेवण्यात आली नाही. अखेर सातारा विकास आघाडीच्या पसंतीचे मुख्याधिकारी सातार्‍यात आले. बापट यांच्या बदलीचा निर्णय नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी काढला असून दि. 12 रोजी तसा अनुपालन अहवाल त्यांना सादर करावयाचा आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya