म्हसवड शहरात आणखी ५ नव्या कोरोना बाधितांची भर : म्हसवड शहराची शतकाकडे वाटचाल

 

आजपासुन शहरात सुरु होणाऱ्या जनता कर्फ्युची माहिती देताना एक म्हसवडकर.



स्थैर्य, म्हसवड दि. २३ : म्हसवड शहरातील कोरोनाची साखळी काही केल्या तुटेना अशी झाली असुन दररोज वाढणारे कोरोना बाधित शहराला कोठे घेवुन जाणार असा प्रश्न म्हसवडकर जनतेला पडलेला असतानाच दि. २३ रोजी आलेल्या अहवालानुसार शहरात आणखी ५ नव्या रुग्णांची भर पडली असुन म्हसवड शहराची शतकाकडे वाटचाल सुरु आहे.


शहरातील यापुर्वी सापडलेल्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील अन्य लोकांचे कोरोना अहवाल हे पॉझीटिव्ह येवु लागल्याने शहरातील बाधितांचा आकडा हा वाढु लागला आहे. दररोज वाढणारे आकडे हे शहरवासीयांची चिंता वाढवत आहेत. म्हसवड शहरातच कोरोनाची प्राथमिक टेस्ट होत असल्याने दररोज याठिकाणी बाधितांच्या संपर्कातील लोकांची तपासणी केली जावु लागल्याने शहरातील बाधितांचा आकडा वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणने आहे. तर शहरातील पॉझीटिव्ह व्यक्तीला मायणी, सातारा आदी ठिकाणी असलेल्या कोव्हिड सेंटर मध्ये ठेवण्यात येत असले तरी बाधितांच्या कुटुंबियांना याबाबतचे गांभीर्य वाटत नसल्याचे दिसुन येते, बाधिताच्या घरातील इतर सदस्य मोकाटपणे बिनधास्त शहरात इतरत्र फिरत असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र याबाबत पोलीस, पालिका व आरोग्य विभाग गप्प आहे. शहरातील आम्ही म्हसवडकर नावाचा असलेला युवकांचा ग्रुप मात्र याबाबत फारच आक्रमक असला तरी त्यांना काही बाबतीत मर्यादा असल्याने मोकाटविरांना आळा घालणार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान दि. २३ रोजी आलेल्या अहवालानुसार येथील शिवाजी चौक येथील २६ वर्षीय युवक, आंबेडकरनगर येथील ६० वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, २५ वर्षीय महिला, ३ वर्षीय बालक आदी जणांना कोरोनाची बाधा झाली असुन आजअखेर म्हसवड शहरात कोरोनाचे ८३ रुग्ण झाले आहेत.



एका महिन्यात झपाट्याने वाढली रुग्ण संख्या -

गत एका महिन्यापुर्वी संपुर्ण माण तालुक्याची आकडेवारी ही शतकाकडे जाणारी होती त्यावेळी तालुका प्रशासन हडबडले होते, मात्र अवघ्या एका महिन्यातच एकट्या म्हसवड शहरातील बाधितांचा आकडा हा ८० पार गेला असुन पुढील काही दिवसांतच तो शतकपुर्ती करेल असा अंदाज आरोग्य विभागा कडुन व्यक्त होत आहे.


आजपासुन शहरात ५ दिवस जनता कर्फ्यु -

म्हसवड शहरातील वाढत जाणारी कोरोनाची साखळी रोखण्यासाठी सर्व म्हसवडकरांनी एकत्र येत दि.२४ ते २९ ऑगस्ट असा सलग ५ दिवसांचा जनता कर्फ्यु पुकारला असुन या काळात शहरातील फक्त मेडीकल्स् व दवाखाने वगळता सर्व काही बंद राहणार आहे. हा जनता कर्फ्यु सर्वांनी काटेकोरपणे पाळावा याकरीता शहरातील नगरसेवक व समाजसेवकांनी एकत्र येत दोन दिवसांपुर्वीच शहरवासीयांना आवाहन केले असुन या ५ दिवसांत जर कोणी आपले दुकान सुरु ठेवले अथवा विनाकारण एखादा रस्त्यावर फिरताना आढळल्यास त्यावर कारवाई निश्चित होणार आहे.



Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya