म्हसवड शहरात आणखी १० कोरोनाचे नवे रुग्ण

 स्थैर्य, म्हसवड दि. २० : म्हसवड शहरात कोरोनाची साखळी लांबत चालली असुन दि.२० रोजी आलेल्या अहवालात शहरात आणखी १० नव्या रुग्णांची भर पडली असुन दररोज वाढणारी रुग्ण संख्या पाहता म्हसवड शहर हे हॉस्पॉट होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.


शहरात सध्या गौरी, गणपतीच्या आगमनाची धामधुम सुरु असल्याने बाजारपेठेत गर्दी वाढत आहे अशावेळी शहरात खरेदीनिमीत्त विविध ठिकाणाहुन येणार्यांची संख्या मोठी असल्याने कोण कोठुन येतोय याची कल्पना ना दुकानदारांना ना खरेदीसाठी फिरणार्या नागरीकांना त्यामुळे शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढु लागले आहेत. यापुर्वी कोरोनामुळे शहरातील छोट्या - मोठ्या व्यावसायिकांची सुमारे ५ महिने दुकाने बंद राहिल्याने आता काय व्हायचे ते होवु दे असे म्हणत सर्वच ठिकाणी नागरीक गर्दी करताना दिसत आहेत, मात्र ही गर्दीच कोरोनाला वर्दी देणारी ठरु लागल्याचे चित्र आहे. शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता म्हसवड शहर हे लवकरच हॉस्पॉट बनण्याची भिती व्यक्त केली जात आहे. शहरात वाढणारी रुग्ण संख्या ही केवळ पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे होत असल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेतुन होत असुन वाढणार्या संख्येबाबत पालिकाच अद्याप गंभीर नसल्याने शहराला कोणी वाली आहे का असा संतप्त सवाल म्हसवडकर जनतेतुन विचारला जात आहे.


सुरुवातीला कोरोना संदर्भात पालिकेने शहरात सर्वत्र निरजंतुकिकरणाची फवारणी केली होती मात्र त्यानंतर ३ महिने उलटुन गेले तरी अद्याप पालिकेने अशी कोठे फवारणीच केली नसल्याचे नागरीकांतुन सांगितले जात आहे. ज्या भागात कोरोनाचा रुग्ण सापडला आहे त्याच ठिकाणी पालिका फवारणी करीत असुन उर्वरीत ठिकाणी अशा प्रकारची फवारणी करण्यास पालिकेकडुन टाळाटाळ केली जात असल्याचे नागरीकांचे म्हणने आहे. शहरात दररोज रुग्ण झपाट्याने वाढत असताना शहरातील गर्दी कमी करण्यासाठी पालिकेकडुन कोणतीही उपाययोजना राबवली जात नसल्याचा आरोप सर्वसामान्य जनता करीत आहे. कोरोनाचे पालिकेला काही पडलेल नाही असेच म्हसवडकर जनता बोलु लागली असुन कोरोनामुळे आजवर शहरातील ४ जणांचा बळी गेला असताना पालिका आणखी किती जणांचे बळी गेल्यावर गंभीर होणार असाही सवाल सामान्य जनता विचारु लागली आहे. कोरोनाच्या पाश्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने जे काही नियम व अटी घालुन दिलेल्या आहेत त्याचे शहरात काटेकोरपणे कोठे पालन होते का नाही हे पाहण्याची तसदीही पालिकेकडुन घेतली जात नसल्यानेच आज म्हसवड हॉस्पॉट बनु लागले असल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान दि. २० रोजी शहरातील २५ नागरीकांची कोरोना टेस्ट येथील कोरोना सेंटर येथे घेण्यात आली त्यामध्ये १० जणांची टेस्ट ही पॉझीटिव्ह आली असुन त्यामध्ये ७० वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, ७६ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, ३२ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष, २२ युवक, ३५ व वर्षीय पुरुष, ७६ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला  अशा १० जणांचा समावेश आहे.म्हसवड शहरात जनता कर्फ्यु सुरु करण्याची मागणी -

म्हसवड शहरात आजअखेर ६३ रुग्ण संख्या झाली असुन आणखी हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याने शहरातील दररोज वाढणारी ही रुग्ण संख्या रोखण्यासाठी शहरात पुन्हा एकदा जनता कर्फ्यु सुरु करावा अशी जोरदार मागणी सर्वसामान्य नागरीकांतुन जोर धरु लागली आहे.

Previous Post Next Post