वाई मतदारसंघातील कोरोना रुग्णांसाठी 500 इंजेक्शन बँक करणार : आ. पाटील

 स्थैर्य, वाई, दि. 23 : कोरोनावर जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्या भागातील कोरोना बाधित रुग्णांची काळजी घेणे आवश्यक आहे. या रुग्णांना द्यावी लागणारी इंजेक्शन्स महागडी आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ती घेणे परवडत नाही. यासाठी वाई - खंडाळा मतदारसंघात ‘पाचशे इंजेक्शन बँक’ करणार असल्याचे आ. मकरंद पाटील यांनी सांगितले.


गरजू रुग्णांसाठी इंजेक्शन्स मोफत उपलब्ध करून देण्याची भूमिका पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी घेतली आहे. त्यानुसार वाई मतदारसंघात पाचशे इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाबळेश्‍वर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे एका उद्योगपतीने 41 इंजेक्शन्स दिली आहेत. वाई शहरातील व तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी साधेपणाने उत्सव करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मंडळेही 50 इंजेक्शन उपलब्ध करून देत आहेत. त्याचप्रमाणे वाई जैन समाजाने 25 इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत. वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर मतदारसंघातील अनेक घटक पुढे आले असून ते या कामात योगदान देत आहेत. त्यांच्या दातृत्वाचा आदर्श घेत इतरांनीही याकामी पुढाकार घ्यावा.


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रेमेडीसिव्हीर इंजेक्शनची मदत करावी, असे आवाहन आ.पाटील यांनी केल्यानुसार महाबळेश्‍वर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी नुकतीच ही इंजेक्शन आ. पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.


यावेळी महाबळेश्‍वर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाडकर, उपाध्यक्ष रोहित ढेबे, संजय जंगम, संदीप मोरे, अनिकेत रिंगे व दीपक ओसवाल आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही इंजेक्शन महागडी असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ती घेणे परवडत नाहीत. त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी 125 इंजेक्शन पाठवली आहेत. वाईतील रुग्णांसाठी इंजेक्शन मिळाली पाहिजेत, अशी भूमिका घेऊन आ. पाटील विविध बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन करत आहेत.


वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर मतदारसंघात दररोज 50 ते 100 कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मतदारसंघातील नागरिकांचा पुणे, मुंबई, सोलापूरशी संपर्क होत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर रेमेडीसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असतो. सध्या वातावरणातील बदल व चाचण्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी मतदारसंघात 500 इंजेक्शन्स बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी अनेक दाते पुढे येत आहेत. माझ्या वाईतील सार्वजनिक गणेश मंडळांनी तर गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा निर्णय घेत कोरोना औषध बँक हा अभिनव उपक्रम राबविला आहे. कार्यकर्त्यांनीही कोरोनासाठी मदतीचा हात दिला आहे. त्यातून 500 इंजेक्शनची बँक करत आहे. आयत्या वेळी गरजूना याची मदत होणार आहे.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya