आ. चव्हाण यांच्या निधीतून पोतलेत उभारले अद्ययावत आरोग्य उपकेंद्र


 


स्थैर्य, कराड, दि. 30 : साधारण 1 कोटी 5 लाख रुपये खर्च करून पोतले (ता. कराड) येथे 5 गुंठे जागेत अद्ययावत व नवीन पॅटर्ननुसार प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून उपकेंद्र उभारणीसाठी सदरचा निधी मिळाला आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, लवकरच ही इमारत जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे.


गावामध्ये आरोग्य उपकेंद्र उभारावे, याबाबत आ. चव्हाण यांच्याकडे ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. उपकेंद्रास निधी प्राप्त झाल्यानंतर पोतले येथील आनंदराव व शिवाजी जगताप यांनी त्यांच्या मालकीची 5 गुंठे जागा केंद्रासाठी दान दिली. याबद्दल आ. चव्हाण यांच्या हस्ते जगताप बंधूंचा सत्कारही करण्यात आला.  पंतोजी मळ्यामध्ये ही इमारत उभारली आहे. दर्शनी प्रवेशद्वारानंतर 41 बाय 28 फूट आकारातील जागेत मुख्य इमारत आहे. केंद्रात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस प्रतीक्षा कक्ष. डाव्या बाजूला रुग्ण तपासणी कक्ष, त्यानंतर प्रसूतिगृह, त्यास लागून स्वच्छतागृह, बेबीवॉश, प्रयोगशाळा, वयोवृद्ध व अपंग रुग्णांसाठी व्हिलचेअर, रॅम्प, वरील मजल्यावर 2 स्वतंत्र निवासस्थाने आदी सुविधांसह चोहोबाजूस संरक्षक भिंत आहे. फळझाडांसाठी बेड, गप्पी मासे केंद्रही साकारले आहे. सहाय्यक बांधकाम अभियंता एस. डी. म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदार सुहास पिसाळ यांनी इमारतीचे काम पूर्ण केले आहे. कोरोना संसर्गाच्या संकटात तालुक्यात रुग्णांवर उपचारासाठी बेड कमी पडत असताना पोतलेमधील आरोग्य उपकेंद्र तारणहार ठरणार आहे. उपकेंद्राचे लवकरच उदघाटन होणार असून, जनतेच्या सेवेत ते रुजू होणार आहे.


अद्ययावत आरोग्य उपकेंद्राची आमची मागणी होती. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी याबाबत पाठपुरावा केला. उपकेंद्र बांधण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी निधी मंजूर केला. सदरचे काम प्रगतिपथावर  असून, येत्या काही दिवसांत नागरिकांच्या सेवेत हे केंद्र रुजू होईल. पोतले गावच्या विकासासाठी पृथ्वीराजबाबांचे मोलाचे सहकार्य असल्याने त्यांचे सर्व ग्रामस्थांच्यावतीने मी आभार मानते.


Previous Post Next Post