वीज वितरणाच्या हलगर्जीपणाने शेतकर्‍याचा मृत्यू

 स्थैर्य, मेढा, दि. 21 : वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे  येथील शेतकरी नारायण किसन पार्टे यांचा शुक्रवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. या शेतकर्‍याचा मृत्यू वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे झाला असून मृत शेतकर्‍याच्या वारसांना वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


वीज वितरण कंपनीच्या वायरमनच्या चुकीमुळे या शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत पंचनामा करू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. अखेर तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना बोलावून घेऊन, चर्चा करून मृत शेतकर्‍याच्या वारसांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची सूचना केली. या दुर्घटनेला वायरमन जबाबदार असून त्याला तातडीने निलंबित करावे, अशी मागणीही संतप्त ग्रामस्थानी केली. यावर दोषी वायरमनवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन शाखा अभियंता राहुल कवठे व दत्तात्रय जरे यांनी दिली.


याबाबत सविस्तर माहिती अशी, येथील शेतकरी नारायण किसन पार्टे हे पट्टीचा तळ या शिवारात गुरांना वैरण आणण्यासाठी सकाळी 7 च्या सुमारास गेले होते. ते लवकर घरी आले नाहीत म्हणून त्यांना पाहण्यासाठी त्यांची पत्नी शेतात गेली असता त्यांना त्यांचे पती नारायण पार्टे हे विजेची तार हातात असलेल्या अवस्थेत आढळून आले. शेतातील तुटलेल्या तारेला स्पर्श होऊन, विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नीने आरडाओरडा करून ग्रामस्थांना गोळा केले. ग्रामस्थांनी गावाला पुरवठा करणारी मुख्य वाहिनी तातडीने बंद केली. तत्काळ याची माहिती ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सहायक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड, जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, सरपंच रवींद्र सल्लक, मंडलाधिकारी ए. ए. मेमन, तलाठी संदीप ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र 4-5 तास उलटून गेले तरी वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आल्याशिवाय मृतदेहाचा पंचनामा करू देणार नाही, अशी भूमिका घेतली.


तहसीलदार पाटील यांनी तत्काळ दोषींवर कारवाई करण्याची सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना केली. यावर शाखा अभियंता राहुल कवठे यांनी दोषी वायरमनला निलंबित करणार असून मृत शेतकर्‍याच्या वारसांना वीज वितरण कंपनीकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिल्यावर संतप्त ग्रामस्थ शांत झाले. मृत शेतकरी नारायण पार्टे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे आजची दुर्घटना घडली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. केळघरसह परिसरात विजेचे खांब सडलेले आहेत. ठिकठिकाणी विजेच्या मुख्य लाइनला झाडाच्या फांद्या चिकटलेल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. वारंवार याबाबत तक्रारी करूनही वीज वितरण कंपनी कोणतीच दखल घेत नसून संबंधित कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असतात, असा आरोपही ग्रामस्थ करत आहेत. वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अजून किती निरपराध नागरिकांचा बळी जाणार आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.


Previous Post Next Post