अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा : समशेरसिंह नाईक निंबाळकर


स्थैर्य, फलटण : गाईच्या दुधाला किमान २५ रुपये दर व दहा रुपये प्रति लिटर याप्रमाणे अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. या मागणीसाठी आज फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून भाजपा नेते व फलटण नगर पालिकेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी नाना पाटील चौकात मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटनचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी फलटण नगरपरिषदेमधील विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मामूशेठ विरकर, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, जयकुमार शिंदे, अनिकेत कदम, भाजपा शहराध्यक्ष उदय मांढरे, अभिजीत नाईक निंबाळकर, सुशांत निंबाळकर, संजय पवार, बजरंग गावडे, अशोकराव भोसले, उषा राऊत, राहुल शहा, काशिनाथ शेवते, संतोष ठोंबरे, रमेश चव्हाण आदी उपस्थित होते. 
 
याप्रसंगी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या दरम्यान संपूर्ण देशात लोक डाऊन असताना तसेच सर्व उद्योग धंदे व्यवसाय बंद असताना शेतकऱ्यांनी दूध उत्पादन करून सर्वांना दूध पोहोचले. आज त्यांच्या दुधाला भाव मिळत नसून राज्य सरकारकडे दूध दरवाढीसंदर्भात वारंवार मागणी करूनही सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. गायीच्या दुधाला किमान पंचवीस रुपये दर व दहा रुपये प्रति लिटर अनुदान द्यावे. अन्यथा या पुढील काळातही तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी गोरगरिबांना दुधाचे वाटप करण्यात आले.
Previous Post Next Post