धोम धरणाच्या 2 दरवाजातून कृष्णा नदीत विसर्ग

 स्थैर्य, वाई, दि. 17 : धोम पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धोम धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रविवारी दुपारी वीजगृहातून व सायंकाळी 5 वाजता मुख्य सांडव्यातून  1 हजार 994 क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आला. सोमवारी सकाळी त्यात 2 हजार 771 क्युसेस वाढ करून धरणातून एकूण 3 हजार 850 क्युसेस पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले आहे. नदी काठावरील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.


गेल्या तीन आठवड्यांपासून धोम व बलकवडी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. आठवड्यापूर्वीच बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले होते. रविवारी धरणातून 1 हजार 800 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. बलकवडीतील पाणी धोम धरणात येत आहे. शिवाय या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी 92.30 टक्के झाली आहे. रविवारी दुपारी 1 वाजता पायथा वीजगृहातून 500 क्युसेस पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले आहे.  सायंकाळी 5 वाजता धरणाचा पहिला व पाचवा दरवाजा उघडण्यात आला असून 805 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे, असे एकूण 1 हजार 250 क्युसेस पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले आहे. रविवारी सकाळी 11 वाजता विसर्ग वाढवण्यात येवून 3 हजार 850 क्युसेस करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिले तर रात्री अधिक प्रमाणात असेच पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. धोम धरण क्षेत्रात आजअखेर 673 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील 24 तासात 40 मि. मी. इतकी नोंद झाली आहे. धरणात 7 हजार 295 क्युसेस पाण्याची आवक होत असून 3 हजार 850 क्युसेस विसर्ग सुरू आहे. पावसाची संततधार पश्‍चिम भागात सुरू असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पाणी महागणपती मंदिरच्या सभामंडपात शिरले आहे. प्रशासनाने नदी काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

Previous Post Next Post