डॉ. दाभोलकरांच्या नावाने अध्यासन केंद्र उभारावे : अरुण जावळे

 स्थैर्य, सातारा, दि. १९ : माणसाच्या जगण्याचा आणि जीवनाचा सरनामा हा विज्ञाननिष्ठ असला पाहिजे. त्याशिवाय अनिष्ट रुढी, भाकड प्रथा, परंपरा यांच्या सांस्कृतिक व धार्मिक गुलामगिरितून माणूस मुक्त होणार नाही, अशी उभ्या महाराष्ट्राला हाक देणारा विवेकवादी सुधारक डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या नावाने महाराष्ट्रस्तरावर एक अध्यासन केंद्र आणि सातारा शहरात पूर्णाकृती पुतळा उभा करावा, अशी आग्रही मागणी साहित्यिक अरुण जावळे यांनी केली.


डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यामध्ये खून झाला त्या घटनेला आज सात वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अरुण जावळे यांनी निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलनाचे महाराष्ट्रात भरीव कार्य केले आहे. बुध्दाने प्रतिपादलेले बुध्दीप्रामाण्यवाद, प्रतित्यसमुत्पाद आणि अनित्यवाद हे अजरामर सिध्दांत जनमाणसांत रुजविण्याची चळवळ त्यांनी गावागावात राबवलीय. खरतरं, डॉक्टरांच्या बलिदानामुळे अंधश्रध्दा निर्मूलनाचा कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे आज भोंदूगिरी आणि बुवाबाजी करणा-या वृत्तींना चाप बसला आहे. विशेषतः धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली ज्या प्रवृत्ती समस्त स्त्रियांचे मानसिक आणि शारीरिक शोषण करत होत्या त्या प्रवृत्तीही गारद झाल्या आहेत. 


डॉ. दाभोलकरांचे हे कार्य म्हाणजे शोषणमुक्त आणि अंधश्रध्दामुक्त महाराष्ट्राचे एक सुंदर विचारशिल्प आहे. या विचारशिल्पाचे चिरंतन स्मरण राहण्यासाठी आणि अवघी महाराष्ट्रभूमी विज्ञानिष्ठ बनविण्यासाठी यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने पुणे, मुंबई अशा ठिकाणी अध्यासन केंद्र उभारावे. ज्यामधून धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली भारतीय समाजाचे कशापध्दतीने शोषण होत आले यावर चिंतन होईल हे पाहिले जाईल. कोणकोणत्या विचारप्रवाहांनी इथली समाजव्यवस्था अंधश्रध्देच्या गर्तेत ओढली गेली आणि या सा-याचा एकूणच भारतीय समाजमनावर काय परिणाम झाला. तसेच कशापध्दतीने सांस्कृतिक नुकसान होत आले यावरही विशेषत्वाने या केंद्रात अभ्यास वा संशोधन होईल.


अवघं जग हे विज्ञानावर चालते आहे. कार्यकारणभाव आणि विवेकवाद याच्या आधारावर जगाचे संचलन सुरूंय. हे धडधडीत आणि शाश्वत सत्य असताना भारतभूमी मात्र आजही अज्ञान आणि अंधश्रध्देत अडकून पडलेली आहे. माणूस शिक्षित होतोय परंतु अंधश्रध्देतून बाहेर कसे यावे हे त्याला उमजत नाही. म्हणजेच तो शिक्षित होऊनही विज्ञानिष्ठ होत नाही, ही खरेतर एका अर्थाने इथल्या शिक्षणव्यवस्थेची हार आहे. मुळात शिक्षणाचा गाभाघटक हा विज्ञानावादी आसायला हवा, हा आग्रह वारंवार डॉ. दाभोलकर सरांनी धरला होता. त्यामुळे त्यांच्या विचाराने प्रगत, समृध्द आणि विज्ञाननिष्ठ महाराष्ट्राची वाटचाल होणे गरजेचे आहे. असे करणे हेच ख-या अर्थाने डॉ. दाभोलकरांना अभिवादन ठरेल असेही साहित्यिक अरुण जावळे यांनी शेवटी म्हटले आहे.

Previous Post Next Post